Wakad News: कोरोना योद्धा वॉर्ड आयाच्या घरी पावणे पाच लाखांची चोरी

पाटील यांचे पती वेडसर असल्याने ते दिवसभर घरी असतात. त्यामुळे पाटील यांनी सुरुवातीला त्यांच्या पतीकडे चौकशी केली.

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील तालेरा हॉस्पिटलमध्ये वॉर्ड आया म्हणून काम करणा-या एका महिलेच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून दोन लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 4 लाख 78 हजार 85 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि.3) सायंकाळी पाच वाजता पवना नगर, काळेवाडी येथे उघडकीस आली.

नंदा शिवाजी पाटील (वय 50, रा. गल्ली नं 2, पल्लवी निवास, पवनानगर काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदा पाटील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील तालेरा हॉस्पिटलमध्ये वॉर्ड आया म्हणून काम करतात. गुरुवारी सकाळी सात वाजता त्या कामावर निघून गेल्या.

सायंकाळी त्यांनी बँकेतून 25 हजार रुपये काढून आणले. घरी आल्यानंतर बँकेतून काढून आणलेले पैसे ठेवण्यासाठी नेहमीचे पैसे आणि दागिने ठेवलेला डबा बघितला असता तो मिळाला नाही.

पाटील यांचे पती वेडसर असल्याने ते दिवसभर घरी असतात. त्यामुळे पाटील यांनी सुरुवातीला त्यांच्या पतीकडे चौकशी केली. ‘मी गुरुवारी कुठेही बाहेर गेलो नाही. पण बुधवारी मी मुलीच्या घरी चहा प्यायला गेलो होतो’ असे त्यांनी पाटील यांना सांगितले.

पाटील यांनी घराच्या टेरेसवर दागिने आणि पैसे ठेवलेला मोकळा डबा मिळाला. चोरट्यांनी त्यांच्या घरात उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

चोरट्यांनी घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि दोन लाख रुपये रोकड असा एकूण 4 लाख 78 हजार 85 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याबाबत पाटील यांनी वाकड पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.