Wakad News : रस्त्यावर आढळलेल्या जखमी सापाला होमगार्डकडून जीवदान

एमपीसी न्यूज – ताथवडे येथे रावेत- सांगवी बीआरटीएस मार्गावर पाच फुटांचा साप आला. हा साप जखमी झाला होता. रस्त्याने जाणा-या गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानाने रस्त्यावर पडलेल्या सापाला पोत्यात पकडले. त्यानंतर त्याला सर्पमित्राच्या स्वाधीन केले. ही घटना आज (बुधवारी, दि. 14) सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास घडली.

आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास रावेत- सांगवी बीआरटीएस मार्गावर पाच फुटांचा तस्कर जातीचा साप आल्याचे काही वाहनचालकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सापाला बघण्यासाठी तसेच त्याला रस्त्याच्या बाजूला जाण्यासाठी वाहने थांबली. यामुळे रस्त्यावार गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, साप जागेवर काही फूट उभा राहून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, त्याच्या शेपटीजवळ जखम झाल्याने त्याला ते शक्य होत नव्हते.

साप जखमी असल्याचे दिसल्याने गर्दीतून सापाला वाचविण्यासाठी व पकडण्यासाठी आवाज येऊ लागले. पण सापाजवळ जाण्याचे धाडस कोणी करत नव्हते. वाकड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले होमगार्ड संजय ताटे रावेत येथून डांगे चौकाकडे जात होते. त्यावेळी ताथवडे येथे रस्त्यावर गर्दी पाहून ते थांबले.

सापामुळे कोंडी होत असून नेमका प्रकार त्यांनी समजून घेतला. बीआरटीएस मार्गावर पडलेले रिकामे पोते सापाजवळ ठेवले. त्यांच्याकडील काठीच्या साह्याने सापाला पोत्यात ढकलण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर सापाला पोत्यात घालून पकडण्यात यश आले. सापांच्या विषारी व बिनविषारी तसेच इतर बाबतीत माहिती नसताना देखील ताटे यांनी मोठ्या धाडसाने सापाला पकडले. त्यामुळे त्यांचे कौतुक झाले.

ताटे यांनी त्या सापाला सर्पमित्र गणेश बुटकर यांच्या स्वाधीन केले. त्याला उपचाराची गरज असल्याने कात्रज येथील वन्य पशूपक्षी अनाथालयात सापाला दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर सापाला निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात येणार आहे.

सर्पमित्र गणेश बुटकर म्हणाले, “तस्कर जातीचा साप बिनविषारी असतो. हा साप महाराष्ट्रात सर्रास आढळतो. छोटी जंगले, मानवी वस्त्यातील गव्हाणी, आडगळीच्या जागा येथे तस्कर जातीचा साप वावरत असतो.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.