Wakad News : मालपाणी सुरमास आणि कास्प काऊंटी क्वीन्सला वाकड प्रीमियर लीगचे विजेतेपद

एमपीसी न्यूज – वाकड परिसरात विनायक गायकवाड युथ फाऊंडेशन तर्फे सोसायटी सभासदांकरिता आयोजित करण्यात आलेल्या वाकड प्रीमियर लीग या स्पर्धेची आज जल्लोषात सांगता झाली. अतिशय उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धेच्या चषकावर पुरुष गटात मालपाणी सुरमास संघाने, तर महिला गटात कास्प काऊंटी क्वीन्स संघाने आपले नाव कोरले.

विनायक गायकवाड युथ फाउंडेशन आयोजित वाकड प्रीमियर लीगचे हे चौथे वर्ष होते या सामन्यांसाठी पुरुष 86 व महिला 13 असे  99 संघ सहभागी झालेले होते. दरवर्षी सोसायटी सभासदांकरिता आयोजित करण्यात येणाऱ्या या क्रिकेट सामन्यांची वर्षभर उत्सुकता असते. फक्त सोसायटीकरिता आयोजित केल्यामुळे आय.टी पार्क मधील वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचे पाहायला मिळते.

यावर्षीचा वाकड प्रीमियर लीग सामन्यांचे पुरुष संघातील प्रथम पारितोषिक मालपाणी सुरमास (मालपाणी सोसायटी) या संघास मिळाले. तर द्वितीय पारितोषिक वेदांता सोसायटी व तृतीय पारितोषिक साठेनगर या संघास मिळाले.

महिला संघाचे प्रथम पारितोषिक कास्प काऊंटी क्वीन्स (कास्प काऊंटी सोसायटी) या संघास मिळाले. तर द्वितीय पारितोषिक सुकासा स्पंक (सुकासा सोसायटी) व तृतीय पारितोषिक डायनॅस्टी डेअरड्रीमर्स (डायनॅस्टी सोसायटी) या संघास मिळाले.

दरम्यान, महापौर उषा ढोरे, माजी नगरसेवक शंकर जगताप, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक शत्रुघ्न काटे, सागर आंघोळकर, माजी स्थायी समिती अध्यक्षा ममता विनायक गायकवाड व माजी नगरसेवक विनायक गायकवाड या मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आला. यावेळी उपस्थित संघांनी या वाकड प्रीमियर लीग विषय अनुभव व मनोगत व्यक्त केले.

जल्लोषात पार पडलेल्या या सांगता समारंभास वाकड परिसरातील सर्व सोसायटीमधील नागरिक, सदस्य व संघ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.