Wakad News: गुटखा विक्री प्रकरणी रहाटणी आणि थेरगावात कारवाई; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – गुटखा विक्री प्रकरणी वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी कारवाया करण्यात आल्या आहेत. रहाटणी येथे केलेल्या कारवाईमध्ये 55 हजार 500 तर थेरगाव येथे केलेल्या कारवाईमध्ये दोन लाख 25 हजार 203 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रहाटणी येथे वाकड पोलिसांनी कारवाई केली. त्या प्रकरणी पोलीस हवालदार मधुकर कोळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दशरथ सदानंद सगर (वय 40, रा. रहाटणी गावठाण. मूळ रा. बार्शी, जि. सोलापूर), कमलेश लुणिया (रा. हडपसर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी दशरथ याने त्याच्या ताब्यात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी बाळगला. पोलिसांनी कारवाई करत 15 हजार 500 रुपयांचा गुटखा आणि 40 हजारांची दुचाकी असा एकूण 55 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दशरथ याला अटक केली आहे.

थेरगाव येथे सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. त्या प्रकरणी पोलीस हवालदार किशोर पढेर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेंद्र पनाराम भाटी (वय 26, रा. गणेश नगर, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी भाटी याने त्याच्याकडे गुटखा साठवून ठेवला आहे. तसेच तो गुटखा विक्री करण्यासाठी जाणार असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी भाटी याची कार आणि दुकानात छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी 790 रुपये रोख रक्कम, एक लाख 14 हजार 413 रुपये किमतीचा गुटखा, एक लाख 10 हजार रुपये किमतीची कार असा एकूण दोन लाख 25 हजार 203 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.