Wakad News: भूमकर चौक, वाकड परिसरातील वाहतूक कोंडीवर प्राधान्याने उपाययोजना करा; विभागीय आयुक्तांचे निर्देश

एमपीसी न्यूज – वाकड, भूमकर चौकात वाहतूक (Wakad News) कोंडीची मोठी समस्या आहे. त्यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. वाकड परिसरातील वाहतूक कोंडीवर प्राधान्याने उपाययोजना कराव्यात असे निर्देश पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पुणे शहर आणि परिसरातील रस्ते विकासासाठी केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे निजी सचिव संकेत भोंडवे आणि पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (मंगळवारी) वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पुणे, सातारा विभाग, विशेषत: कात्रज ते देहूरोड विभागाचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. सध्याची रहदारी आणि पुढील भविष्यातील रहदारी लक्षात घेता कात्रज ते देहूरोड या दोन्ही बाजूंच्या डीपी रोड/सर्व्हिस रोडसह पश्चिमेकडील वळणाचा विकास एकत्रित करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने जमीन उपलब्ध करून द्यावी लागेल, असे ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, महापालिका (Wakad News) क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या 12 मीटर रुंदीच्या सर्व्हिस रोडच्या जमिनीचे संपादन करण्यासाठी महापालिका पुढे आहे. ‘एनएचएआय’चेद्वारे त्याचे बांधकाम करावे. याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर तो सक्षम प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी सादर केला जाईल, असे एनएचएआयने स्पष्ट केले.
याशिवाय रावेत, भूमकर चौक, वाकड, मुठा नदी येथील वाहतूक कोंडीवरही चर्चा करण्यात आली. विभागीय आयुक्तांनी या ठिकाणच्या चौकांच्या एकात्मिक विकास सुधारणांसाठी निर्देश दिले. एनएचएआय या विभागांसाठी डीपीआर करत आहे. हिंजवडी येथील आयटी पार्क आणि उद्योगधंद्यांची वस्ती, वस्ती वाढल्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होत असल्याच्या विविध तक्रारी जनतेकडून येत आहेत. तपशीलवार तोडगा काढून त्यानुसार प्राधान्याने कामे हाती घेण्याचे निर्देशही देण्यात आले. सल्लागाराने तयार केलेल्या तपशीलवार डीपीआर नंतर अंतिम उपाय जिल्हा प्रशासन आणि राज्य प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला जाईल. प्राधिकरणाच्या पुढील मूल्यांकनासाठी आणि मान्यतेसाठी तो कळविला जाईल, असे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.