Wakad News: वाकड अपहरण, खून प्रकरण; …म्हणून त्यांनी दिली नाही मुलाच्या बेपत्ता होण्याची पोलिसांत खबर

मृत संतोष हे मेडिकलचे साहित्य पुरवठा करण्याचा व्यवसाय करीत होते. 16 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता संतोष व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या दुचाकीवरून घराबाहेर पडले.

एमपीसी न्यूज – वाकड परिसरातील रहाटणी येथून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याचा खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुरुन टाकला. ही घटना 2 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. मुलगा 16 ऑगस्ट रोजी बेपत्ता होऊनही घरच्यांनी बेपत्ता होण्याची खबर पोलिसांना दिली नाही. कारण यापूर्वी देखील मृत मुलगा दोन ते तीन महिने घरातून काहीही न सांगता निघून गेला होता. त्यानंतर तो परत आला होता.

संतोष शेषराव अंगरख (वय 42, रा. संतोष निवास, पोलीस कॉलनी, श्रीनगर, रहाटणी) असे अपहरण आणि खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेषराव रंगनाथ अंगरख (वय 63) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी गणेश सुभेदार पवार (वय 37, रा. स्वामी समर्थ कॉलनी, तापकीर नगर, काळेवाडी) याला अटक केली आहे. गणेश याच्यासह त्याच्या अन्य दोन साथीदारांच्या विरोधात अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मृत संतोष हे मेडिकलचे साहित्य पुरवठा करण्याचा व्यवसाय करीत होते. 16 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता संतोष व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या दुचाकीवरून घराबाहेर पडले. ते परत आलेच नाहीत. फिर्यादी यांनी त्यांचा काळेवाडी, थेरगाव, वाकड परिसरात शोध घेतला. परंतु, संतोष यांचा काहीही पत्ता लागला नाही.

यापूर्वी संतोष अशाच प्रकारे घरातून कुणाला काहीही न सांगता निघून गेले होते. दोन-तीन महिन्यानंतर संतोष परत घरी आले होते. त्या अनुभवावरून फिर्यादी यांनी याबाबत लगेच पोलिसांत खबर दिली नाही.

संतोष यांनी व्यवसायासाठी आरोपी गणेश याच्याकडून पैसे घेतले होते. ते पैसे मागण्यासाठी गणेश दोन वेळेला फिर्यादी यांच्या घरी आला होता. त्यावेळी संतोष यांनी गणेशला बाहेर नेऊन काहीतरी करणे देऊन पैसे देणे टाळले होते. त्यावरून त्यांच्यात वाद देखील झाला होता.

दरम्यान, 16 ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजता संतोष यांच्या मोबाइलवरून त्यांच्या मुलीला फोन आला होता. आपण गणेश पवार याच्या गाडीत त्याच्या दोन मित्रांसह आडले, कासारसाई येथे असून रात्री उशिरा घरी येईन, असे फोनवरून संतोष यांच्या मुलीला सांगण्यात आले होते.

संतोष त्या रात्री घरी आले नाहीत. फिर्यादी यांनी संतोष यांच्या मोबाइलवर फोन केला. त्याला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून फिर्यादी यांनी गणेशकडे संतोष यांच्याबाबत चौकशी केली. त्यावेळी गणेशने फिर्यादी यांना उलटसुलट उत्तरे दिली. त्यावरून फिर्यादी यांना गणेश याच्यावर संशय बळावला. त्यानंतर त्यांनी 25 ऑगस्ट रोजी वाकड पोलीस ठाण्यात संतोष यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली.

असा केला खून…

आरोपी गणेश आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून संतोष यांचे रहाटणी येथून त्यांच्या गाडीतून अपहरण केले. संतोष यांना कासारसाई जवळ आडले येथे नेले. तिथे संतोष यांच्या डोक्यात दगड आणि जेसीबीची बकेट मारून त्यांचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी संतोष यांचा मृतदेह तिथेच पुरून टाकला. पोलिसांनी गणेश याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.