Wakad : ‘भाई का बर्थडे’ रस्त्यावर साजरा करणे पडणार महागात

एमपीसी न्यूज – ‘भाई का बड्डे’ म्हणत मित्र मंडळींचा वाढदिवस रात्री अपरात्री रस्त्यावर साजरा करणे. मोठमोठ्याने फटाके वाजवणे, आता महागात पडणार आहे. पोलिसांकडून अशा भाई का बड्डे साजरा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. अशा वाढदिवसामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास होत असल्याने याविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी नुकतेच दिले आहेत.

रात्री 12 वाजता भर रस्त्यात, चौकात गर्दी करून फटाके वाजवणे, यातून दहशत निर्माण करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातूनच मारामारीचे प्रकारही घडत आहेत. या प्रकारामुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारे वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम 290, 143, 147, 149 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37, 135 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

गुरुवारी (दि. 22) पहाटे सव्वाबाराच्या सुमारास काळेवाडी मधील मराठी शाळेसमोर गंगाराम उर्फ संदीप शंकर तांबे (वय 26) या तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यात येत असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन बर्थडे बॉय संदीप याच्यासह त्याच्या 10-12 मित्रांना ताब्यात घेत त्यांच्यावर जनतेस उपद्रव करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे तसेच जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यरात्री एकत्र जमून वाढदिवस साजरा करताना अनेक वेळा भांडणे, दंगा करणे, वाहनांची तोडफोड करणे, परिसरात दहशत पसरविणे यांसारख्या घटना शहरात घडल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसांना आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असून यापुढील काळात अशा प्रकारे वाढदिवस साजरा करणे पूर्ण बंद करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.