Wakad : एका फोनकॉलमुळे लागला खुनाचा छडा ; वाकड पोलिसांनी केली दोघांना अटक

एमपीसी न्यूज- पत्नीशी अश्लील भाषेत बोलल्याच्या कारणावरून एका तरुणाने मित्राच्या मदतीने आपल्या एका सहकाऱ्याचा खून करून मृतदेह नदीत टाकला. आपण केलेला खून पचला, अशा भ्रमात असलेल्या आरोपीना मात्र पोलिसांना आलेल्या एका फोनमुळे गजाआड व्हावे लागले. पोलिसांनी आपला खाक्‍या दाखविताच आरोपींनी खुनाची कबुली दिली.

रोहित किसन कांबळे (वय 19, रा. सुदर्शन कॉलनी, वाकड रोड, वाकड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या खून प्रकरणी इलियाज शेख (वय 30, रा. पवारनगर, थेरगाव) आणि आकाश साळवे (वय 25, रा. रहाटणी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मीना किसन कांबळे (वय 45) यांनी
वाकड पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात अपहरणाची फिर्याद दिली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पोलीस आयुक्‍त वाकड येथे पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास येणार होते. या कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त असताना एक फोन आला. फोनवरील व्यक्‍तीने थोडक्‍यात हकीगत सांगून आरोपींबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त असतानाही पोलिसांनी एक पथक संशयित आरोपींना आणण्यासाठी पाठविले. अवघ्या काही वेळेतच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. सुरवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाक्‍या दाखविताच त्यांनी खुनाची कबुली दिली.

आरोपी आणि मृत तरुण हे तिघेजण रिक्षा चालवतात. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रवासी घेण्याच्या कारणावरून भांडणही झाले होते. गुरुवारी सायंकाळी दारू पिण्यासाठी आपण मावळ परिसरात जाऊ, असे मयत रोहित याला सांगितले. त्यानंतर ते तिघेजण मावळात दारू पिण्यासाठी गेले. तिथे मयत याने आरोपींपैकी एकाच्या पत्नीबाबत अपशब्द वापरले. त्यामुळे त्यांच्यात वादही झाला. त्यानंतर मृत तरुणाने आपल्या अंगावर लघुशंका केल्याने आपण त्याचा गळा दाबून खून केल्याचे पोलिसांना सांगितले.

रोहितचा खून केल्यावर मृतदेहाचे काय करायचे, याबाबत मित्र असलेल्या पोलिसांना विचारणा करण्यासाठी आरोपींनी रोहितच्याच रिक्षामधून मृतदेह काळेवाडी पोलीस चौकीजवळ आणला. मात्र पोलीस आपल्यालाच अडकवतील या भीतीने त्यांनी पुन्हा रिक्षा माघारी फिरविली व मृतदेह संगमवाडी येथून नदीपात्रात टाकून दिला. रविवारी दुपारी मृतदेह पुण्यातील कल्याणीनगर परिसरात आढळून आला. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.