Wakad : भूमकर चौकातील एकेरी वाहतूकीमुळे स्थानिकांना मनस्ताप; तात्काळ उपाययोजना करा

खासदार श्रीरंग बारणे यांची पोलीस आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज – आयटी  पार्क हिंजवडीकडे जाण्या-या भूमकर चौक, विनोदेवस्ती  व लक्ष्मी चौकातील  ( Wakad )  मार्गावर एकेरी वाहतूक केल्याने कोंडी सुटण्याऐवजी त्यात भर पडली आहे. एकेरी वाहतूक पद्धतीमुळे नागरिक, व्यापारी यांना दोन किलोमीटरचा वळसा मारावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तत्काळ प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पोलीस प्रशासनाला केल्या आहेत.

Bhosari : छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर

याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, आयटी पार्क हिंजवडीकडे जाण्या-या भूमकर चौक विनोदेवस्ती आणि लक्ष्मी चौकातील  मार्गावर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. या एकेरी वाहतूक पद्धतीमुळे  त्या भागातील नागरिक, व्यापारी यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. त्या भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. किरकोळ कामासाठी सुद्धा दोन किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. हे त्रासदायक ठरत आहे. त्याच भागातून जाताना वाहतूक कोंडी होत असून पादचा-यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे.

या संदर्भात या भागातील नागरिक व व्यापारी यांनी त्यांना होणा-या त्रासाची कैफियत माझ्याकडे मांडली आहे. यातून लवकरात लवकर मार्ग काढावा. अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. त्यामुळे आपण गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, असे बारणे ( Wakad ) यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.