Wakad : रस्त्यावर पडलेली टोपी उचलून दिल्यावरून तरुणावर चाकूने वार

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जात असताना समोरच्या दुचाकीस्वाराची टोपी रस्त्यावर पडली. त्याला वळून यावे लागू नये यासाठी तरुणाने मदत म्हणून रस्त्यावर पडलेली टोपी उचलून दिली. त्यावरून तिघांनी मिळून तरुणाला शिवीगाळ करत चाकूने मारून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 3) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

महेश सुधाकर पवार (वय 25, रा. सेनापती बापट रोड, पुणे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी महेश आणि त्याचा मित्र दिनेश दीपक सुर्वे (वय 27) हे दोघेजण दुचाकीवरून जात होते. ते थेरगाव येथील गव्हाणे हॉस्पिटल समोरून जात असताना त्यांच्या पुढे एका दुचाकीवरून तीनजण जात होते. त्यातील एकाची टोपी रस्त्यावर पडली. समोरच्या दुचाकीस्वाराला मागे वळून यावे लागू नये यासाठी महेश यांनी टोपी उचलून आरोपी तरूणाला दिली. त्यावरून तिघा आरोपींनी महेश यांना शिवीगाळ करत चाकूने मारले. यामध्ये महेश जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.