Wakad : घड्याळाच्या दुकानाची चौकशी पडली 98 हजारांना !

एमपीसी न्यूज – घड्याळाच्या दुकानाची ऑनलाइन चौकशी केली. माहिती पाहत असताना एका दुकानाच्या साईटवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. त्यावरून सांगण्यात आले की, ‘घड्याळाची माहिती मिळविण्यासाठी आलेल्या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरा व पाच रुपये पाठवा.’ ग्राहकाने पाच रुपये पाठवले असता सायबर गुन्हेगारांनी ग्राहकाच्या बँक खात्यातून 98 हजार रुपये काढून घेतले. ही घटना 20 ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या सुमारास काळेवाडी फाटा, वाकड येथे घडली.

विवेक विजय देशमुख (वय 32, रा. रहाटणी लींक रोड, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7029118207, 9330732982, 9223011112 या मोबाईल धारक अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक यांनी 20 ऑक्टोबर रोजी मनगटी घड्याळ खरेदी करण्यासाठी गुगलवर जस्ट इन टाईम शिवाजीनगर पुणे या घड्याळाच्या दुकानाची माहिती सर्च केली. त्यावेळी घड्याळाच्या दुकानाची माहिती आणि 7029118207 हा मोबाईल क्रमांक आला. विवेक यांनी या मोबाईल क्रमांकावर ‘जी शॉक’ या घड्याळाची माहिती मिळविण्यासाठी संपर्क केला. त्यावेळी आरोपींनी घड्याळाच्या माहितीसाठी विवेक यांच्या मोबाईल फोनवर लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरून पाच रुपये पाठवण्यास सांगितले. काही वेळानंतर आरोपींनी 9330732982 या मोबाइल क्रमांकावरून एक मेसेज पाठवला आणि 9223011112 या मोबाईल क्रमांकावर आणखी पाच रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार विवेक यांनी पुन्हा पाच रुपये पाठवून दिले. यानंतर काही वेळेतच विवेक यांच्या सिटी बँकेच्या खात्यावरून 98 हजार रुपये कमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.