Wakad: पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाकड व परिसरातील तीन हजारहून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांची शिखर संस्था असलेल्या पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

हिंजवडी आयटी पार्कमुळे वाकड परिसरात खूप मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. हजारोंच्या घरात असलेल्या या गृहनिर्माण सोसायट्यांना सध्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे या गृहनिर्माण सोसायट्यांची शिखर संस्था असलेल्या पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणी नाही, तर मतदान नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर फेडरेशनने लोकशाहीच्या पवित्र कार्यात सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे.

फेडरेशनचे पदाधिकारी व इतर सदस्यांनी आमदार लक्ष्मण जगताप, नगरसेवक संदीप कस्पटे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, राम वाकडकर यांच्यासोबत सोसायट्यांना तोंड द्यावे लागत असलेल्या पाणी समस्येसंदर्भात चर्चा केली. आमदार जगताप यांनी शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे ही समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले. तसेच संपूर्ण शहराला समान पाणीपुरवठा व्हावा यासाठी नियोजन सुरू असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे वाकड परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या पाण्याचा प्रश्नही लवकरच सोडविण्याबाबत फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले.

त्यामुळे फेडरेशनने विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी रहाटणी येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.