Wakad : फेसबुक लोकेशन फिचरचा गैरवापर करून खंडणीसाठी व्यावसायिकावर गोळीबार

चार जणांना अटक

एमपीसी न्यूज – फेक फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून व्यावसायिकाशी मैत्री वाढवून खंडणीसाठी सहा जणांनी मिळून गोळीबार केला. ही घटना शनिवारी (दि. 1) मुंबई-बेंगलोर महामार्गावर वाकड येथे घडली. पोलिसांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेत चौघांना अटक केली.

किरण ज्ञानदेव काळे (वय 25, रा. कोथरूढ), अभिलाश दत्तात्रय मोहोळ (वय 25, रा.मुळशी), रोहीत प्रदीप देवळे (वय 20, रा.कोथरड), अक्षय भीमराव गोडंबे (वय 24, रा.कोथरुड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हरिओम मेहेरसिंग (वय 30, रा. सुतारवाडी, पाषाण. मूळ रा. राजस्थान) असे गोळीबार झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिओम भारतीय मुलांना परदेशात शिक्षणासाठी ऍडमिशन मिळवून देण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या आर्थिक उलाढालीचा आरोपी महिनाभरापासून मागोवा घेत होते. आरोपींनी हरीओम यांची माहिती काढल्यानंतर त्यांनी नंदिनी मोहोळ या फेक अकाऊंटवरून हरीओम यांच्यावर पाळत ठेवली. मात्र हरीओम हे काही दिवस राजस्थान येथे गेले असल्यामुळे आरोपींना त्यांचा डाव साधता आला नाही. मात्र फसबुवरील चॅट नुसार हरीओम हे 30 नोव्हेंबर रोजी पुण्यात येणार अशी माहिती आरोपींना मिळाली. त्यानुसार त्यांनी कट रचला. घटनेपूर्वी काही दिवस ते प्रत्यक्ष त्यांच्या मागावर होते. शनिवारी डाव साधत आरोपींनी हरिओम यांना धमकावले, मात्र हरीओम हे हातून निसटले व त्यांनी आरडाओरड केल्याने आरोपींचा डाव फसला. आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये हरिओम गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक महेश बारकुले व अभिजीत कुंभार हे अवघ्या पाच मिनिटात तेथे पोहोचले व घटनास्थळी कारमध्ये एक इसम संशयास्पद थांबला असल्याचे त्यांना दिसले. त्याला ताब्यात घेतल्यानतर हा सहा जणांचा कट असल्याचे उघड झाले. त्यातील चार जणांना पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

आरोपी उच्चशिक्षित असून त्यातील काळे हा इंटेरिअर डिजायनर आहे. मोहोळ याने बीएससी पूर्ण केले आहे. तर इतर दोघांचे बारावीपर्यंत शिक्षण झालेले आहे. यातील गोडंबे याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा व मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. पोलीस या प्रकरणातील इतर दोघांचा शोध घेत असून यामध्ये कोणत्या मोठ्या टोळीचा हात आहे का, याचा देखील तपास घेत आहे. यावेळी पोलिसांनी आरोपीकडून एक पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.