Wakad : निकालाच्या दिवशी अतिउत्साही कार्यकर्त्यांवर पोलिसांचे असणार बारीक लक्ष

एमपीसी न्यूज – निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवाराचे कार्यकर्ते अति उत्साहमध्ये विरोधी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसोबत हुज्जत घालण्याची शक्यता असते. तसेच एकमेकांना डीवचण्याचा प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी अशा कार्यकर्त्यांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि अन्य तांत्रिक बाबींची मदत घेतली आहे. त्याद्वारे अति उत्साही आणि उपद्रव करणा-या कार्यकर्त्यांवर पोलीस बारीक लक्ष ठेवणार आहेत.

शहरातील बहुतांश भाग सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे. वाकड परिसरात मागील काही दिवसांपूर्वी शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गुरुवारी (दि. 24) विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलवर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर काही अति उत्साही कार्यकर्ते गोंधळ घालण्याची शक्यता असते. यावर अंकुश ठेवण्यासाठी तसेच शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सज्ज झाले आहेत.

विरिधकांना चिड येईल, अशा मोठ्याने घोषणा देणे, सार्वजनिक रस्त्यावरून कर्ण-कर्कश आवाज करून वेगाने वाहन चालवणे, जबरदस्तीने अंगावर गुलाल टाकणे, विरोधकांकडे पाहून विचित्र हावभाव केल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणा-या घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाल्यास त्याचे चित्रण पोलिसांकडे द्यावे. शहरातील सर्व व्यावसायिक आणि दुकानदारांना देखील पोलिसांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

सीसीटीव्ही कॅमे-यांमध्ये अशा प्रकारच्या घटना कैद झाल्यास संबंधितांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे वाकड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.