Wakad : राम वाकडकर युवा मंच व पोलिसांचा एक हजार बांधकाम मजूर कुटुंबांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज – राम वाकडकर युवा मंच वाकड यांच्या वतीने आणि वाकड पोलिसांच्या मदतीने वाकड परिसरातील महाराष्ट्र आणि इतर राज्यातील बांधकाम साईटवर काम करणाऱ्या एक हजार मजूर कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला आहे. दहा दिवस पुरेल एवढे अन्नधान्य देण्यात आले आहे.

वाकड परिसरात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि इतर राज्यातील मजूर वर्ग पोट भरण्यासाठी आला आहे. विविध बांधकाम साईटवर काम करून ही कुटुंबे आपली गुजराण करीत आहेत. सध्या लॉकडाऊनचा कालावधी असल्याने सर्व बांधकाम साईट ठप्प झाल्या आहेत. यामुळे या मजुरांच्या हातचे काम बंद पडले आहे. हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबांचे आर्थिक संकटाने हाल होत आहेत.

लॉकडाऊन आणि आर्थिक संकट या दोन्हीच्या कात्रीत हा मजुरवर्ग सापडला आहे. वाकड मधील राम वाकडकर युवा मंचने या मजुरांच्या आर्थिक संकटात मदत करण्याचे ठरविले. मात्र, संचारबंदी असल्याने सर्वसामान्य नागरिक बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे वाकड पोलीस आणि युवा मंचने संयुक्तपणे हा उपक्रम राबविला आहे. सोमवारी सकाळी युवा उद्योजक राम वाकडकर यांनी एक हजार कुटुंबांना दहा दिवस पुरेल एवढे अन्नधान्याचे फूड पाकिटे वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्याकडे सुपूर्द केली.

राम वाकडकर युवा मंचने दिलेल्या मदतीत एका पाकिटात पाच किलो गव्हाचे पीठ, पाच किलो बासमती तुकडा तांदूळ, एक किलो तेल, एक किलो तूर डाळ, एक किलो मीठ, पण किलो तिखट यांचा समावेश आहे. एका पाकिटाची किंमत सुमारे 800 रुपये असून एकूण आठ लाख रुपयांचे साहित्य वाटप करण्यात आले आहे. ‘पोलिसांचे निर्देश पाळा, कोरोनाचा संसर्ग टाळा’ असा मजकूर फूड पाकिटांवर लिहून एक चांगला संदेश देखील देण्यात आला आहे.

लॉकडाऊनच्या परिस्थितीत जी कुटुंबे आर्थिक विवंचनेत अडकली आहेत, त्यांच्या मदतीला धावून जायला हवे. पण ही मदत करताना कुठल्याही प्रकारचा गवगवा न करता तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांचा भंग होणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी. असे आवाहन वाकड पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.