Wakad Crime News : साहेब ! एक गुन्हा माफ करा

मेडिकल व्यवसायिकाचे अपहरण करणाऱ्या आरोपींची पोलिसांकडे विनवणी

एमपीसी न्यूज – सहा जणांनी मिळून एका मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण केले. तसेच मेडिकल व्यवसायिकाकडे सहा लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींनी ‘एक गुन्हा माफ करा’, अशी पोलिसांकडे विनवणी केली.

टायगर ग्रुपचा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सिद्धार्थ भारत गायकवाड (वय 32), राहुल छगन लोंढे (वय 24), प्रकाश मधुकर सजगणे (वय 31, तिघे रा. अष्टविनायक कॉलनी, वाकड), प्रीतेश बबनराव लांडगे (वय 30, रा. प्रभात कॉलनी, वाकड), कमलेश राजकुमार बाफना (वय 32, रा. वाकड), संतोष बापू ओव्हाळ (वय 28, रा. वाकड) आकाश विजय हारकरे (वय 27, रा. चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

अशोक बेलिराम आगरवाल (वय 53, रा. विकास नगर, किवळे) असे अपहरण आणि सुटका झालेल्या मेडिकल व्यवसायिकाचे नाव आहे. त्यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या काही अनोळखी व्यक्ती आगरवाल यांच्या मेडिकलमध्ये घुसले. त्यांनी पोलीस असल्याचे सांगत कपाटातील एमटीपी कीट व दोन फायली घेतल्या. तसेच, या गोळ्या मेडिकलमध्ये ठेवल्यास तुमच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. सर्वांना येरवडा जेलची हवा खावी लागेल, अशी भीती दाखवीत जबरदस्तीने आगरवाल यांना त्यांच्या मोटारीत बसविले.

दत्त मंदिर वाकड रस्त्यावर फिरवून आगरवाल व डॉ. खरे यांना जिवे मारण्याची धमकी दिली व एक तासाच्या आत पाच ते सहा लाख रुपये देण्याची मागणी केली. या प्रकाराबाबत डॉ. खरे यांनी वाकड पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना फोन लावून विचारपूस केली.

त्यावेळी ते म्हणाले की, ‘आमचे असे कोणीही पोलीस आले नाहीत. त्यानंतर त्यांनी उपनिरीक्षक अशोक जगताप व विजय वेळापुरे यांना घटनास्थळी पाठविले. या दोघांनी क्षणाचाही विलंब न करता डांगे चौक गाठले असता आरोपी त्यांना बघून पळू लागले. मात्र, त्यांनी पाठलाग करून पाच जणांना पकडत मोटारीत बसविलेल्या व्यावसायिकाची सुटका केली.

दोन आरोपी फरारी झाले होते. त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी आकाश हारकारे हा महाराष्ट्र गृहसुरक्षा रक्षक दलाचा कर्मचारी तर आरोपी प्रितेश लांडगे हा ग्रामसुरक्षा दलाचा सदस्य आहे.

आरोपी पोलीस अधिकाऱ्याचा वाढदिवस असला की बुके आणि केक घेऊन जात असे. वृक्षारोपण असो किंवा पोलिसांचा कोणताही कार्यक्रम असला की आरोपी न बोलविता कार्यक्रमास हजेरी लावून पोलिसांशी सलगी वाढवत असे. आम्ही सर्वजण समाजकार्य करत असतो. त्यामुळे तुम्ही आमचा हा एक गुन्हा माफ करा, अशी विनवणी आरोपी पोलिसांना करीत होते.

मात्र, वरील आरोपींनी कोणालाही पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी उकळली असेल तर नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन वाकड पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.