Wakad : तडीपार गुन्हेगाराला शस्त्रासह अटक; वाकड पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – तडीपार गुन्हेगार आपल्या तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच शहरात आला. तसेच हत्यार बाळगत राजरोसपणे दुकानदारांना धमकी देऊन दहशत निर्माण केली. वाकड पोलिसांनी त्याला शस्त्रासह अटक केली आहे.

समीर नवाब शेख (वय 21, रा. लक्ष्मणनगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सुरज सुतार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर शेख याला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्याच्या अगोदर तो शहरात आला. मंगळवारी (दि. 28) त्याने आपल्या सोबत लोखंडी कोयता बाळगून गुजरनगर, थेरगाव येथील दुकानदारांना शिवीगाळ करत धमकी देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार वाकड पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीकडून पोलिसांनी एक दुचाकी आणि लोखंडी कोयता असा एकूण 25 हजार 150 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.