Wakad : पादचा-याला उडवून पुरावा नष्ट करण्यासाठी जाहिरातीच्या ट्रकमध्ये फेकला मृतदेह

ही घटना जानेवारी 2017 मध्ये घडली असून पोलिसांनी याबाबत तपास करत 28 जुलै 2020 रोजी गुन्हा दाखल केला आहे.

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या पादचा-याला अज्ञात वाहनाने उडवले. त्यानंतर आरोपी वाहन चालकाने पादचा-याच्या मोबईलवरून नातेवाईकांशी संपर्क करून खोटी माहिती दिली. अपघाताचा पुरावा नष्ट करण्यासाठी अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात न नेता जाहिरातीच्या ट्रकमध्ये फेकून दिले. ही घटना जानेवारी 2017 मध्ये घडली असून पोलिसांनी याबाबत तपास करत 28 जुलै 2020 रोजी गुन्हा दाखल केला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत बाबुराव पाटील असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत चंद्रकांत पाटील हे वाहन चालवण्याचे काम करत होते. 9 जानेवारी 2017 रोजी ते रायगड येथून बदली ड्रायव्हर म्हणून पुण्याला आले होते. त्यावेळी पाटील वाकड फाटा ते विशालनगर पिंपळे निलख या दरम्यानच्या रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी अज्ञात वाहन चालकाने त्यांना उडवले. यात पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाणे आवश्यक होते.

मात्र, आरोपी वाहन चालकाने पाटील यांच्या मोबईल फोनवरून पाटील यांच्या नातेवाईकांना संपर्क केला आणि अपघाताची खोटी माहिती सांगितली. त्यानंतर पाटील यांना रुग्णालयात दाखल न करता अपघाताचा पुरावा नष्ट करण्यासाठी जवळच असलेल्या जाहिराच्या ट्रकमध्ये पाटील यांना फेकून दिले.

पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, कसून तपास केल्यानंतर काही धागे उलगडत गेले. हा अकस्मात मृत्यू नसून अपघात आहे, ही बाब लक्षात येताच याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.