Wakad : प्रवासादरम्यान कारमध्ये विसरलेली 70 हजारांची रोकड असलेली बॅग वाकड पोलिसांनी शोधून मूळ मालकास केली परत

एमपीसी न्यूज – मुंबई ते पुणे या प्रवासादरम्यान एका प्रवाशाची बॅग कारमध्ये विसरली. वाकड येथे उतरल्यानंतर हा प्रकार प्रवाशाच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवल्यानंतर वाकड पोलिसांनी कारचा शोध घेतला. कारमध्ये 70 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग मूळ मालकाला परत केली.

निलेश मारुती साळुंखे (वय 32, रा. बोरिवली ईस्ट, मुंबई) असे बॅग परत केलेल्या प्रवाशाने नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी निलेश साळुंखे 26 ऑक्टोबर रोजी त्यांच्या मूळगावी सातारा येथे जात होते. मुंबई येथून कळंबोली नाक्यावरून ते खासगी प्रवासी कारमधून पुण्याला निघाले. प्रवासादरम्यान त्यांनी त्यांची बॅग कारच्या डिक्कीमध्ये ठेवली. बॅगमध्ये 70 हजार रुपयांची रोकड होती. पुण्यात ते भूमकर चौक येथे उतरले. कारमधून उतरताना निलेश त्यांची बॅग काढून घेण्यास विसरले. कार निघून गेल्यानंतर त्यांची बॅग विसरल्याचे निलेश यांच्या लक्षात आले.

निलेश यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कारची कोणतीही माहिती नसताना वाकड पोलिसांनी कारचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत निलेश यांनी प्रवास केलेल्या कारचा शोध घेतला. निलेश यांनी दिनेश कसबे (रा. सुसगाव) यांच्या एम एच 12 / पी क्यू 4719 या कारमधून प्रवास केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कारचालक कसबे यांच्या घरी जाऊन कारची डिक्की तपासली असता त्यात निलेश यांची बॅग असल्याचे निष्पन्न झाले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्रकुमार राजमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी सचिन नरुटे, विक्रम कुदळ, सुरज सुतार, प्रशांत गिलबिले यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.