Wakad : ऑस्ट्रेलिया मधील बिग बॅश टी 20 मॅचवर सट्टा घेणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या बिग बॅश टी 20 क्रिकेट मॅचवर सट्टा घेणा-या दोघांना काळेवाडी मधून अटक करण्यात आली. ही कारवाई खंडणी दरोडा विरोधी पथकाने केली. आरोपींकडून 1 लाख 15 हजार 105 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मनीष राजकुमार तलरेजा (वय 41, रा. बी बिल्डिंग, केडीएम प्लॅनेट, विजय नगर, काळेवाडी), नितीन तिरंतदास कुकरेजा (वय 35, रा. धर्मा अपार्टमेंट, जुन्या कीर्ती हॉस्पिटलमागे, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे यांना माहिती मिळाली की, ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या बिग बॅश टी 20 या क्रिकेटच्या सामन्यांवर काळेवाडी मधील केडीएम प्लॅनेट, बी बिल्डिंग, विजयनगर येथे दोनजण सट्टा घेत आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मनीष आणि नितीन या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एलईडी टीव्ही, सेट टॉप बॉक्स, नऊ मोबाईल फोन, रायटिंग पॅड, पेन, इलेक्ट्रिक वायर, मोबाईल चार्जर, लॅपटॉप, लॅपटॉप चार्जर असे एकूण 1 लाख 15 हजार 105 रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपींवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पुरुषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी गणेश हजारे, राजेंद्र शिंदे, अजय भोसले, विक्रांत गायकवाड, आशिष बोटके, नितीन लोखंडे, शैलेश सुर्वे, नितीन खेसे, अनिता जाधव यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.