Wakad : थेरगावात भरदिवसा दोन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा दोन लाख पाच हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 4) दुपारी साडेचारच्या सुमारास थेरगाव येथे उघडकीस आली.

गणेश बबन माळवे (वय 45, रा. महाराष्ट्र कॉलनी, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माळवे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घराला कुलूप लावून सर्व कुटुंबियांसह चिंचवड येथे गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश करीत घरातील सोन्याचे दागिने आणि 20 हजारांची रोकड असा दोन लाख पाच हजारांचा ऐवज चोरून नेला. माळवे साडेचारच्या सुमारास घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.