Wakad : महिलेला रस्त्यात अडवून घरच्यांना मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेला अडवून तिच्याशी शाब्दिक हुज्जत घालून तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 2) थोपटे लॉन्ससमोर रहाटणी येथे सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वडगाव फाटत येथे राहणा-या एका 24 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला स्वयंपाकाचे काम करतात. ते नवीन काम पाहण्यासाठी त्या रविवारी सायंकाळी पायी जात होत्या. रहाटणी येथील थोपटे लॉन्स समोरील रस्त्याने जात असताना आरोपी तरुणाने त्यांचा रस्ता अडवला. ‘तू माझ्यासोबत बोलत का नाहीस’ असे म्हणत त्याने महिलेला अश्लील शिवीगाळ केली. यानंतर महिला रस्त्याने पुढे जात असताना ‘तू माझ्याशी बोलली नाहीस तर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकीन’ अशी धमकी दिली. यावरून महिलेने वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.