Wakad : गणेशोत्सवाच्या वर्गणीसाठी खूनी हल्ला करणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यू – गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याने आठ ते दहा जणांच्या टोळक्याने व्यापा-याच्या डोक्यात लोखंडी पहार घातली. तर त्याच्या आईला बेदम मारहाण केली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी मुख्य आरोपीसह तीन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला अटक केली आहे.

सागर राजेंद्र घडसिंग (वय 22), निखील सुभाष डाडर (21) आणि बाबासाहेब संतोष पवार (वय 21, तिघेही रा. वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. मुकेश चौधरी असे खूनी हल्ल्यात जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. रमेश देवराम चौधरी (वय 32) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे वाकड रोड येथे ‘माताजी कलेक्शन’ नावाने कपड्याचे दुकान आहे. बुधवारी रात्री आरोपींनी आपसात संगनमत करून त्यांच्या दुकानावर अचानक हल्ला चढवला. आरोपी दुकानाच्या दरवाजाची जोरजोरात जाळी वाजवू लागल्याने मुकेश आणि त्यांची आई जमनीबाई दोघे बाहेर आले. आरोपींनी ‘सद्गुरू कॉलनी येथील ओमसाई गणपती मंडळाला पाच हजार रुपयांची वर्गणी का देत नाही’ असे म्हणून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

यावेळी आरोपी सागर याने त्याच्या हातातील लोखंडी पहार मुकेश यांच्या डोक्यात मारली. तसेच, अन्य आरोपींनी जमनीबाई यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मुकेश रक्तभंबाळ अवस्थेत पडल्याचे पाहून आरोपींनी तेथून पळ काढला. यामध्ये मुकेश यांच्या डोक्याला आणि जमनीबाई यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी घडसिंग आणि त्याचे दोन साथीदार डांगे चौक परिसरात येणार असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून तिघांना अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.