Wakad: बेरोजगारीला कंटाळून एकाच दिवशी तीन कामगारांची आत्महत्या

Wakad: Three workers commit suicide on the same day due to unemployment बेरोजगारीमुळे आत्महत्या करण्याचे सत्र सुरूच आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी- चिंचवड शहरात मंगळवारी (दि.23) तीन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या तिघांनीही बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. बेरोजगारीमुळे आत्महत्या करण्याचे सत्र सुरूच आहे.

पहिली घटना वाकड येथील कावेरीनगर पोलीस वसाहतीसमोर घडली.विश्‍वंभर केशव शिंदे (वय 40, रा. रमाबाईनगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे कामगार असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून ते आर्थिक विवंचनेत होते.

दरम्यान, त्यांनी सोमवारी रात्री वाकड येथील कावेरीनगर पोलीस वसाहती समोरील झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास एका पादचाऱ्याने पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

दुसरी घटना पंचनाथ कॉलनी, काळेवाडी येथे घडली. या घटनेत अक्षय रामचंद्र बनसोडे (वय 27, रा. पंचनाथ कॉलनी, काळेवाडी) या तरुणाने आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा एका खासगी कंपनीत कामाला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे दोन ते अडीच महिन्यांपासून तो घरीच होता.

दरम्यान, सोमवारी रात्री त्याने साडीच्या सहाय्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास ही घटना उघकीस आली. या दोन्ही घटनांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.

तिसरी घटना निगडी येथील पीसीएमसी कॉलनीत घडली. एका अज्ञात इसमाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेला व्यक्‍ती हा लॉकडाऊनपूर्वी शहरात आला होता.

दोन तरुणांसोबत तो राहण्यास होता. त्याच्याही हाताला काम नव्हते. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास त्याने राहत्या घरात पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. या इसमाची रात्री उशिरापर्यंत ओळख पटवण्याचे काम सुरु होते. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.