Wakad : वाहनचोरी करणाऱ्या दोघांना अटक; 11 दुचाकी जप्त

वाकड पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – वाहन चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 11 दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील सहा, हिंजवडी पोलीस ठाण्यातील दोन, भोसरी एमआयडीसी, देहूरोड, तळेगाव पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण अकरा गुन्हे उघडकीस आले आहेत.

राहुल अंकुश क्षीरसागर (वय 19, रा. कामशेत) आणि अक्षय दशरथ शिंदे (वय 20, रा. चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिस ठाण्यातील टीम क्रमांक 15 आणि टीम क्रमांक 16 वाकड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी डांगे चौकातून थेरगावच्या बाजूला एका दुचाकीवर दोघेजण संशयितरीत्या जाताना दिसले. त्यावरून 15 नंबर टीमने 16 नंबर टीमला कळवले. 16 नंबर टीमने त्यांना थेरगाव येथे पकडले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून दुचाकीवरील दोघांना ताब्यात घेत वाकड पोलिस ठाण्यात आणले.

पोलीस ठाण्यात चौकशी करत असताना ताब्यात घेतलेले दोघेजण वापरत असलेली दुचाकी चोरीची असून तिचा नंबर बदलून ते वापरत असल्याचे समजले. त्यावरून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी शहर परिसरात 11 दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. मौजमजेसाठी दुचाकी चोरी करायची. तिच्यातील पेट्रोल संपले असता ती दुचाकी तिथेच सोडून द्यायची आणि नंतर दुसरी दुचाकी चोरायची, असा या दोघांचा दिनक्रम होता. वाकड पोलिसांनी दोघांना अटक करत दोन लाख 21 हजार रुपये किमतीच्या 11 दुचाकी जप्त केल्या.

  • ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, साहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) ज्ञानेश्‍वर साबळे, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, विकास मडके, पोलीस कर्मचारी अनिल महाजन, रजनीकांत कोळी, सुनील काटे, सेलूकर, सनी गोंधळे, विशाल ओव्हाळ, जावेद मुजावर, बापूसाहेब धुमाळ, नितीन ढोरजे, दीपक भोसले, विक्रम जगदाळे, विजय गंभीरे, नितीन गेंगजे, सुरज सुतार यांच्या पथकाने केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.