Wakad : कोयत्याने प्राणघातक हल्ला करून तीन वर्षांपासून फरार असलेल्या दोघांना वाकड पोलिसांकडून कर्नाटकमधून अटक

एमपीसी न्यूज – तरुणावर लोखंडी कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केल्यानंतर घर सोडून पळून गेलेल्या दोन आरोपींना वाकड पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केली आहे. तसेच एका तडीपार आरोपीला देखील वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

शांतलिंग उर्फ शुभो उर्फ शांताराम सोनू माने (वय 24), सचिन सुद्राम वाघमारे (वय 34, दोघे रा. मादनहिपरग्गा, ता. आळंद, जि. गुलबर्गा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथील समर्थ कॉलनी विजयनगर येथे 14 ऑक्टोबर 2017 रोजी चार जणांनी मिळून अतुल नलावडे (वय 30, रा. काळेवाडी) याच्यावर लोखंडी कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केला. याबाबत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यातील आदित्य क्षीरसागर आणि देवानंद जमादार या दोघांना अटक केली. दरम्यान, अन्य दोन आरोपी शांताराम माने आणि सचिन वाघमारे हे तळेगाव दाभाडे येथे राहत होते. गुन्हा केल्यानंतर दोघांनी तळेगाव दाभाडे येथील घर सोडून कर्नाटक येथे पळ काढला.

वाकड पोलीस रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर यांना माहिती मिळाली की, वरील गुन्ह्यातील दोन्ही आरोपी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यात राहत आहेत. त्यानुसार, वाकड पोलिसांचे एक पथक गुलबर्गा येथे रवाना झाले. गुलबर्गा येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

  • तडीपार गुन्हेगाराला अटक
    वाकड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार शाम उर्फ महेश शहादेव पटेकर (वय 23, रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) याला 10 जानेवारी 2020 रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपार केल्यानंतरही तो वाकड परिसरात येत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी शाम बाबा यांना मिळाली. पोलिसांनी म्हातोबानगर झोपडपट्टी येथे सापळा रचून आर;ओरोपी शाम याला अटक करून त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक निरीक्षक हरीश माने, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, तपास पथकातील कर्मचारी बापूसाहेब धुमाळ, विक्रम जगदाळे, प्रमोद कदम, प्रशांत गिलबिले, शाम बाबा, रमेश गायकवाड यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.