Wakad : विमानाने येऊन नामांकित हॉटेलमध्ये राहून घरफोडी करणारा उच्चभ्रू चोर जेरबंद

वाकड पोलिसांनी केली उत्तर प्रदेशमधून अटक; आठ लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – उत्तर प्रदेशमधून विमानाने पुण्यात यायचा. पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये तीन ते चार दिवस राहायचा. दरम्यानच्या कालावधीत परिसरातील घरांची पाहणी करून संधी साधत घरफोडी करायचा. या उच्चभ्रू चोरट्याला वाकड पोलिसांनी उत्तर प्रदेश मधून अटक केली. त्याच्याकडून 25 तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा एकूण 8 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

अनिल मिश्री राजमर (वय 36, रा. बोदरी, जि. जोनपूर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जुलै रोजी माउली रेसिडेन्सी येथे एका फ्लॅटमध्ये चोरी झाली. चोरट्याने नऊ तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा ऐवज चोरून नेला. त्यानंतर 25 जुलै रोजी थेरगाव येथील ओशियन मिडोज सोसायटी येथे आणखी एक फ्लॅट फोडल्याची घटना घडली. यामध्ये चोरट्याने 137 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

तीन दिवसांमध्ये दोन घरफोड्या झाल्या यामध्ये चोरट्यांनी एकूण 25 तोळे वजनाचे दागिने चोरून नेले. या गुन्ह्यांची वाकड पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तीन टीमच्या साहाय्याने या प्रकरणाचा तपास सुरु केला. त्यावेळी एका नामांकित हॉटेलमधील एका वेटरने एका इसमाची संशयास्पद हालचाल असल्याचे सांगितले. त्यावरून त्याचा शोध घेत पोल्सीणी अनिल याला उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथून ताब्यात घेतले.

त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने हे दोन्ही गुन्हे केल्याचे कबूल केले. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला याप्रकरणी दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीकडून पोलिसांनी 25 तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा एकूण आठ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

आरोपी अनिल हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी मुंबईमधील वाळीव पोलीस ठाण्यात तीन आणि पुणे येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एक असे एकूण चार घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. अनिल उत्तर प्रदेशमधून विमानाने पुण्यात येतो. तो तीन ते चार दिवस पुण्यातील एखाद्या नामांकित हॉटेलमध्ये राहत असे. दरम्यानच्या कालावधीत तो भागातील बंद फ्लॅटची पाहणी करून दिवसा घरफोडी करीत असे. चोरलेल्या सोन्याची विल्हेवाट तो शहरातच लावून पुन्हा विमानाने गावी जात असे. हा उच्चभ्रू चोरटा वाकड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी विक्रम जगदाळे, प्रशांत गिलबिले, नितीन गेंजगे, तात्यासाहेब शिंदे, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, नितीन ढोरजे, जावेद पठाण, दीपक भोसले, प्रमोद भांडवलकर, भैरोबा यादव, विजय गंभीरे, शाम बाबा, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, सुरेश भोसले, नूतन कोंडे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.