Wakad : हरियाणात 33 दिवस तळ ठोकून ‘त्या’ दरोड्यातील आरोपी जेरबंद

वाकड पोलिसांची कामगिरी ; 23 लाखांचे दागिने हस्तगत

एमपीसी न्यूज- रहाटणी येथील पुणेकर ज्वेलर्समध्ये व्यावसायिकावर गोळीबार करून दुकानातून 62 लाख 50 हजार रुपये किमतीचे अडीच किलो सोने पाच जणांनी मिळून चोरून नेले होते. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान वाकड पोलिसांनी युद्धपातळीवर तपासचक्रे फिरवत तब्ब्ल 33 दिवस हरियाणामध्ये तळ ठोकून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 23 लाख रूपये किमतीचे 750 ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले.

सुभाष मोहनलाल बिशनोई (वय 24, रा. मंगाली मोहबत, ता. व जि. हिसार, रा. हरियाणा) व महिपाल दुधाराम जाट (वय 21, रा. बालेवाडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्याच्या इतर साथीदारांचा अद्याप शोध सुरू आहे.

दिव्यांक प्रदीप मेहता यांचे कोकणे चौक परिसरातील आकाशगंगा सोसायटीजवळ पुणेकर ज्वेलर्स नावाने सराफी दुकान आहे. 6 मार्च रोजी आरोपी दुकानात घुसले. पिस्तूल उगारून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत दागिने बॅगेत भरू लागले. त्यावेळी मेहता यांनी प्रतिकार करत आरोपींच्या अंगावर झडप मारली. दरम्यान त्यातील एकाने मेहता यांच्यावर गोळी झाडली. गोळी मेहता यांच्या मांडीतून आरपार गेल्याने ते जखमी होऊन खाली कोसळले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच आरोपींनी 62 लाख 50 हजार रुपये किमतीचे अडीच किलोचे दागिने बॅगेत भरले व पोबारा केला.

काही मिनिटातच शहरात बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. विशेष म्हणजे त्याच दिवशी पोलीस महासंचालक शहरात आले होते. वाकड पोलिसांसह गुन्हे शाखेच्या सर्व विभागांनी युद्धपातळीवर तपास सुरु केला. तांत्रिक गोष्टीच्या अधारे तपास करत धागे गोळा केले. सुमारे साडेनऊ हजार लोकांच्या ‘सीडीआर’ तपासले. दरम्यान दरोडेखोर हरियाणा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वाकड पोलिसांचे एक पथक हरियाणात दाखल झाले. हिसारच्या जंगलात 33 दिवस राहून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून 23 लाख रूपये किमतीचे 750 ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले. दरम्यान त्यांनी दरोड्याच्या दिवशीच वाटणी केली व इतर साथीदार अद्याप ताब्यत न आल्याने सर्व मुद्देमाल मिळू शकला नाही. मात्र. स्वतः पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी पत्रकार परिषद घेत वाकड पोलिसांचे कौतुक केले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, गुन्हे विभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, फौजदार हरिष माने, सिद्धनाथ बाबर, कर्मचारी शाम बाबा, बापूरसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, मनोज बनसोडे, नितीन ढोरजे, जावेद पठाण, विजय गंभीरे, दीपक भोसले, मधुकर चव्हाण, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, सुरेश भोसले, रमेश गायकवाड, भैरोबा यादव, दत्तात्रय इंगळे, डी. डी. सणस, विक्रम जगदाळे, विक्रांत चव्हाण, सुरज सुतार, मयूर जाधव, हनुमंत राजगे, सागर सूर्यवंशी, नूतन कोंडे, मयूर वाडकर या पथकाने कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.