Wakad : वाकड पोलिसांची विशेष नाकाबंदी; मोबाईल ऍपद्वारे दोन तासात दीड हजार संशयित वाहनांची तपासणी

एमपीसी न्यूज – वाकड पोलिसांनी वाकड परिसरात दोन तासांची विशेष नाकाबंदी केली. या नाकाबंदी दरम्यान वाकड पोलिसांनी तब्बल दीड हजार संशयित वाहनांची मोबाईल ऍपद्वारे तपासणी केली. बुधवारी (दि. 18) रात्री वाकड मधील दहा महत्वाच्या ठिकाणी ही नाकाबंदी करण्यात आली.

शहरामध्ये वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वाकड पोलिसांनी आपल्या हद्दीमध्ये भुजबळ चौक, मानकर चौक, चंद्रमाउली गार्डन समोर, हँगिंग ब्रिज, तापकीरमळा चौक, प्रसूनधाम रोड, एमएम कॉलेज, लकी बेकरी चौक, रहाटणी चौक, आयवना टॉवर समोर या ठिकाणी नाकाबंदी लावली.

नाकाबंदीमध्ये प्रत्येक पॉइंटला चार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. पोलिसांनी मोबाईलमध्ये असणाऱ्या ऍपच्या मदतीने संशयित वाहनांचे नोंदणी क्रमांक क्रॉस चेक केले. मोबाईल ऍपमध्ये वाहनांचा क्रमांक टाकल्यास मालकाचे नाव, चासी क्रमांक, इंजिन क्रमांक आदी माहिती काही सेकंदात मिळते. त्यामुळे वाहनचोरी सारख्या गुन्ह्यांना आळा बसणे शक्य होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.