Wakad: पाणीपुरवठा ‘एनओसी’ प्रकरण भोवले; उपशहर अभियंत्याला आयुक्तांची समज

एमपीसी न्यूज – पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर झाल्याने वाकड परिसरातील नवीन बांधकांमाना परवानगी देण्यात येऊ नये, असा निर्णय झाला असतानाही त्याकडे दुर्लक्ष करुन दहा बांधकाम व्यावसायिकांना ना-हरकत (एनओसी) प्रमाणपत्र देणे उपशहर अभियंत्याला चांगलेच भोवले आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उपशहर अभियंता रामदास तांबे यांना सक्त ताकीद दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील चिंचवड मतदारसंघात गृहप्रकल्पांचा सुकाळ आहे. पावसाळा सुरु झाला असून पावसाचे प्रमाण सध्या कमी असून पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर आहे. यामुळे पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी, किवळे इत्यादी भागात ‘काहीकाळ’ गृहप्रकल्प बांधण्यास परवानगी देण्यात येऊ नये, असा ठराव 13 जून 2018 झालेल्या स्थायी समितीत आयत्यावेळी करण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेने या परिसरात पाणीपुरवठा ‘एनओसी’ देणे बंद केले होते.

  • तथापि, पाणीपुरवठा आणि जलनि:सारण विभागाने दहा बांधकाम व्यावसायिकांना ‘एनओसी’ दिल्याचे उघडकीस आले. त्यामुळे उपशहर अभियंता रामदास तांबे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. त्यावर वाकड परिसरातील बांधकामांना पाणीपुरवठा विभागाकडील ‘एनओसी’ देणे बंदच करण्यात आले नव्हते. ही वस्तुस्थिती नाही. नियंत्रणाखालील पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी, किवळे या भागातील ‘एनओसी’ दिल्या नाहीत. सदस्य पारित ठरावानुसार तत्कालीन शहर अभियंत्यांशी चर्चा करुनच पुर्ववत अटीसह ‘एनओसी’ दिल्या आहेत. परिस्थितीनुरुप कार्यवाही केल्याचे तांबे यांनी खुलाशात म्हटले.

तर, पाणीपुरवठा विभागाच्या सहशहर अभियंता कार्यालयाने दिलेल्या अहवालात पाणीपुरवठा विभागाकडील ‘एनओसी’ कधीपासून देण्याचे बंद केले. तसेच पुन:श्‍च देण्याचे कधीपासून चालू केले हे निश्‍चितपणे सांगणे शक्‍य नसल्याचे नमूद केले होते. सदस्य पारित ठरावाची अंमलबजावणी करताना धोरणात्मक बाब म्हणून वरिष्ठ प्राधिकारी यांच्याशी सल्लामसलत, चर्चा आयुक्तांची विधिवत मान्यता घेणे अपेक्षित होते. परंतु, तांबे यांनी तशी कार्यवाही केली नाही.

  • त्यामुळे त्यांचा खुलासा संयुक्तिक वाटला नाही. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 56 (2)’अ’चे अर्थांतर्गत तरतुदीनुसार एकवेळ संधी म्हणून तांबे यांना सक्‍त समज देण्यात आली. तसेच भविष्यात कर्तव्य पार पाडताना तत्पतरता आणि सचोटी न आढळल्यास, कर्तव्यात कसूर केल्यास जबर शास्तीची करवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.