Wakad : जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण रॅली; वाकड पोलिसांचा उपक्रम

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त वाकड पोलिसांच्या वतीने महिला सक्षमीकरण रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी, विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी देखील या रॅलीमध्ये सहभाग घेतला.

शनिवारी (दि. 7) झालेल्या महिला सक्षमीकरण पायी रॅलीची सुरुवात सकाळी वाकड पोलीस ठाण्यापासून झाली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त विनायक ढाकणे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली.

रॅलीमध्ये डी. वाय. पाटील कॉलेज, लोकमान्य टिळक विद्यालय, गणेशनगर थेरगाव, माध्यमिक विद्यालय थेरगाव, माध्यमिक विद्यालय वाकड गावठाण, ब्लॅक कोब्रा कमांडो स्कूल सांगवी यांचे प्लाटून, वाकड परिसरातील हाऊसिंग सोसायट्यांमधील महिला सहभागी झाल्या. सुमारे 500 विद्यार्थिनी आणि महिलांनी रॅलीत सहभाग घेतला.

महिला सक्षमीकरण रॅली वाकड पोलीस स्टेशन पासून सुरु झाली. पुढे वाकड रोडने जानोबा चौक, माउली चौक, उत्कर्ष चौक, वाकड चौक, मानकर चौक, यशोदा मंगल कार्यालय वाकड या मार्गावरून ही रॅली काढण्यात आली.

कार्यालयात महिला सक्षमीकरण मेळावा घेण्यात आला. मेळाव्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत येसूबाई महाराणी यांची भूमिका साकारणा-या प्राजक्ता गायकवाड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर अध्यक्षस्थानी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे उपस्थित होते. मेळाव्यासाठी उप आयुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्राजक्ता गायकवाड म्हणाल्या, “मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेणे काळाची गरज आहे. महिलांनी ठरवले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.”

अपर आयुक्त रामनाथ पोकळे म्हणाले, “महिलांच्या सुरक्षेबाबत पोलीस यंत्रणा सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे. महिलांसाठी भरोसा सेल, बडीकॉप यांसारख्या सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामार्फत महिलांनी आपल्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचवाव्यात. आजच्या काळात सायबर गुन्हे आणि त्याबाबत आवश्यक जनजागृती असणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

महिला सक्षमीकरण मेळाव्यात महाविद्यालयांमधील महिला मुख्याध्यापिका, प्राध्यापिका, राष्ट्रीय स्तरावरील महिला खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप आयुक्त विनायक ढाकणे यांनी केले. सूत्रसंचालन योगिता पाखले यांनी केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवताळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी हनुमंत राजगे, सुदर्शन कापरे, बाळासाहेब पन्हाळे, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, तुषार साळुंखे, नितीन गेंगजे, हेमंत हांगे, सागर सूर्यवंशी, श्रुती सोनवणे, मोहिनी थोपटे आदींनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.