Wakad : प्रेमात धोका दिल्याने प्रियकराचा प्रेयसीवर चाकूने हल्ला

प्रियकर गजाआड; प्रेयसीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु

एमपीसी न्यूज – पाच वर्षांपासून एकत्र राहत असलेल्या प्रेयसीचे दुस-या तरुणाशी सूत जुळले असल्याने तिने प्रियकराला धोका दिला. या दुःखातून प्रियकराने प्रेयसीवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना आज (बुधवारी) सकाळी दहाच्या सुमारास थेरगाव येथील डांगे चौकात घडली. हल्ला करणारा प्रियकर दारूच्या नशेत होता. त्याला जवळपास असलेल्या नागरिकांनी चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या हल्ल्यात प्रेयसी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

विकास शांताराम शेटे (वय 21, रा. वाडा, खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. 20 वर्षीय तरुणी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास आणि तरुणीचे शालेय जीवनापासून प्रेमप्रकरण सुरु होते. विकासने मागील पाच वर्षांपूर्वी घरच्यांच्या विरोधात जाऊन गौरीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. तिच्यासाठी त्याने त्याचे घरदार सोडले. विकास चाकण येथील एका कंपनीत काम करत होता. दोघेही चाकण येथे काही दिवस राहिले. त्यानंतर दोघेजण मिळून मुंबई येथे कामानिमित्त गेले. विकास मिळेल ते काम करत होता.

चार वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून भांडण होऊ लागले. यामुळे तिने विकासपासून फारकत घ्यायला सुरुवात केली. ती त्याच्यापासून वेगळी राहू लागली. दरम्यान ती एका खाजगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करू लागली. त्यांच्या भांडणाचे खटके वारंवार उडत होते. मागील काही दिवसांपूर्वी विकासने तिला एका अनोळखी तरुणासोबत पाहिले. त्याला दोघांचा संशय आल्याने त्याने दोघांवर पाळत ठेवली.

  • दोन दिवसांपूर्वी विकासने तिच्यासोबत असणा-या अनोळखी तरुणाला एकटे गाठले. त्याच्याकडे तिच्याबाबत विचारपूस केली. त्याने आपल्याला तिच्याबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर विकासने तरुणाचा मोबाईल हिसकावून तरुणीला फोन केला. तरुणी आणि दुस-या तरुणामध्ये झालेलं संभाषण त्याने पाहिले. तरुणीची भेट घेऊन विकासने याबाबत जाब विचारला. त्यावेळी तरुणी विकासला हिणवून बोलली.

ज्या मुलीसाठी आई-वडील, घरदार सोडले तिने एका नवख्या तरुणासाठी आपल्याला सोडले. हे दुःख विकासला सहन झाले नाही. त्याने मंगळवारी (दि. 25) सायंकाळी बाजारातून एक चाकू आणि दारू खरेदी केली. रात्री उशिरापर्यंत तो दारू पीत बसला. तो सकाळी उठून पुन्हा दारू पिला आणि तरुणीला मारण्यासाठी तिच्या शोधात निघाला. डांगे चौकात आल्यानंतर त्याला तरुणी कामावर जाताना दिसली. त्याने मागून जाऊन तिच्यावर चाकूने वार केले.

  • दोघांच्यामध्ये झटापट झाली. त्यावेळी तरुणीच्या पाठीवर, हातावर आणि छातीवर वार झाले. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दारूच्या नशेत असलेल्या विकासला जवळपास असलेल्या नागरिकांनी पकडले आणि चांगला चोप दिला. यामध्ये तो देखील जखमी झाला. नागरिकांनी घटनेची माहिती वाकड पोलिसांना देत विकासला पोलिसांच्या स्वाधीन केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.