Walhekarwadi: आयुष्यात आई-वडिलांना महत्वाचे स्थान द्या -सिंधुताई सपकाळ

महिला बचतगटांचा महिला मेळावा संपन्न  

एमपीसी न्यूज- आयुष्यात आलेल्या संकटाना धीराने सामोरे जायला हवे. महिलांनी स्वतःला कमकुवत न समजता काम करायला हवं. तुम्ही तुमच्या आयुष्यात आई वडिलांना महत्वाचे स्थान द्या. आई वडिलांनी केलेलं उपकार कधीही विसरू नका. महिलांमध्ये असलेली सहनशीलतेची ताकत ही एकप्रकारे देवाने दिलेली देणगी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी केले. 
वाल्हेकरवाडी परिसरातील विविध महिला बचत गटांची आर्थिक उन्नती व्हावी आणि महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने या परिसरातील विविध महिला बचत गट, महिला महासंघ यांच्या वतीने एक दिवसीय महिला मेळाव्याचे आयोजन शुभम गार्डन येथे करण्यात आले होते. त्यावेळी सिंधुताई सपकाळ बोलत होत्या.
  • यावेळी व्यासपीठावर आमदार विदया चव्हाण, राष्ट्रवादीचे निरीक्षक घनश्याम शेलार, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, जयश्री भोंडवे, अपर्णा मिसाळ, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंके, उषा साळुंखे, उषा क्षीरसागर, पौर्णिमा पाळेकर, नीता पाटील, उमा क्षीरसागर, राणी आहेर आदी मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमासाठी हजारो महिला उपस्थित होत्या.

पुढे बोलताना सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, “देशाच्या विकासात स्वातंत्र्यपूर्व काळापासून महिलांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे भारतात महिलांना मानाचे स्थान आहे. महिला सक्षमीकरणासाठी शासनासोबतच विविध समाजसेवी संस्था सर्व स्तरातून प्रयत्न करीत असून महिलांनीही पुढाकार घेऊन त्यांच्या हक्कासाठी लढले पाहिजे. त्यासाठी महिलांनी शिक्षण घेऊन स्वावलंबी होण्याची आवश्यकता असून महिलांनी देशाच्या विकासात योगदान द्यावे” शिक्षण घेऊन महिलांनी स्वत:ला मर्यादेत ठेवल्यास महिलांकडे बघण्याची जगाची दृष्टीकोल बदलेल असेही सिंधुताई सपकाळ यावेळी म्हणाल्या.
  • दरम्यान, यावेळी जागतिक दर्जाचे उधोग, व्यवसाय आणि त्यामधील महिलांना संधी या विषयावर व्यवसाय मार्गदर्शक पोपट काळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. एक दिवसीय महिला मेळाव्याचे आयोजन राजलक्ष्मी महिला बचत गट, क्रांतीजोती सावित्रीबाई फुले बहुउदेशीय सामाजिक संस्था, जय मल्हार प्रतिष्ठान, राजलक्ष्मी सखी मंच, महिला बचत गट महासंघ, जिजाऊ महिला मंडळ, हिरकणी महिला बचत गट, कुलस्वामिनी महिला बचत गट तसेच वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, चिंचवडेनगर, बिजलीनगर, रजनीगंधा, आहेरनगर, सायली कॉम्प्लेक्स व इतर बचत गटांच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी केले तर सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी केले. जयश्री भोंडवे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.