Pune : भाचीची छेड काढणाऱ्याला मामाने यमसदनी धाडले

एमपीसी न्यूज – पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांना रविवारी (20 जानेवारी) एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला होता. शवविच्छेदन अहवालात त्या तरुणाचा खून झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत खून करणाऱ्या दोघांना अटक केली. मयत तरुण आरोपीच्या भाचीची छेड काढत होता. त्यामुळेच त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

कृष्णा गिरीश सोनवणे (वय २२, रा. आदर्शनगर, काळेवाडी) असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी इर्शाद महंमद शेख (वय 28, रा. काळेवाडी) आणि सोमनाथ ऊर्फ सोमा पांडुरंग थोरात (वय 27, रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गुरुवारी (17 जानेवारी) दारू पिण्याच्या बहाण्याने त्याला आपल्यासोबत घेऊन गेले. त्यानंतर रावेत येथील मुकाई चौकात त्याला नेऊन दारू पाजली आणि गळा दाबून बेशुद्ध केले. त्यानंतर डोक्यात दगड टाकून हत्या केली. त्यानंतर इर्शाद शेख याच्या टेम्पोतून हा मृतदेह वारजे येथील एका पुलावरून नदीत फेकून दिल्याचे संशयित आरोपीने कबुल केले.

मयत कृष्णा सोनवणे हा आरोपी सोमा थोरात याच्या भाचीची छेड काढत होता, त्यामुळे हा राग त्याच्या मनात होता. तर दुसरा आरोपी इर्शाद शेख याला आर्थिक देवाण-घेवाणीवरून शिवीगाळ केली होती. त्यामुळे कट रचून आरोपींनी मयताचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.