Nigdi News : प्रभाग 14 ज्ञानेश्वर कॉलनीत पिण्याच्या पाण्याला चक्क पेट्रोल आणि रॉकेलचा वास

एमपीसी न्यूज – प्रभाग 14, ज्ञानेश्वर कॉलनी, भंगारवाडी मध्ये नळाला येणा-या पिण्याच्या पाण्याला पेट्रोल आणि रॉकेलचा वास येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत. 19 आणि 21 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी आलेल्या पाण्याला पेट्रोल आणि रॉकेलचा वास आल्याचे नागरिकांनी सांगितले.

भंगारवाडी येथील रहिवासी राजेश खाडे यांनी सांगितले की, ‘शहरात एकदिवस आड पाणी येते आहे, त्यात 19 आणि 21 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी आलेल्या पाण्याला पेट्रोल आणि रॉकेलचा वास येत होता. तसेच, पाणी देखील गढूळ होते. काल शनिवारी आलेले पाणी स्वच्छ होते आणि त्याला कोणताही वास नाही आला. पण दोन दिवस खराब पाणी आल्याने चार दिवस नागरिकांना त्रास सहन करावा लागला.’

विठ्ठल प्रतिष्ठानचे निखिल दळवी यांनी याबाबत अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा) यांना निवेदन दिले आहे. ‘गढूळ आणि कचरा मिश्रित पाणी आल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. पाण्याला पेट्रोल आणि रॉकेलचा वास येत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालावे,’ अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.