Wardha: वर्धा ते पुणे असा तब्बल 650 किमीचा प्रवास करून त्याने केली वडगाव मावळमध्ये घरफोडी

Wardha: After traveling 650 km from Wardha to Pune, he committed burglary in vadgaon maval या चोरट्यावर हिंगोली, वसमत, वडगाव मावळ, पुणे, अर्धपूर, वर्धा आदी ठिकाणी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

एमपीसी न्यूज – वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे येऊन घरफोडी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला वर्धा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यावर हिंगोली, वसमत, वडगाव मावळ, पुणे, अर्धपूर, वर्धा आदी ठिकाणी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सराईत चोरट्यासह त्याच्या एका साथीदाराला देखील अटक करण्यात आली आहे.

अजय उर्फ दुडी सुरकास पवार (वय 20, रा. आर्वी (लहान), ता. हिंगणघाट, जि. वर्धा), रामाचारी बिस्कीट पवार (वय 22, रा. वसमत, जि.हिंगोली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट ते पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ हे सुमारे 650 किलोमीटर अंतर आहे. आरोपी चोरटा अजय पवार याने एवढे अंतर पार करून वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचा गुन्हा केला. त्यानंतर त्याने हिंगोली, वर्धा जिल्ह्यात देखील काही ठिकाणी दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडी यांसारखे गुन्हे केले.

वर्धा शहर पोलीस ठाण्यात 4 जुलै रोजी एक घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत हातिम अकबर खान (वय 52, रा. स्टेशन फैल, वर्धा) यांनी फिर्याद दिली होती. समीर चिकन सेंटर नावाचे खान यांचे दुकान आहे.

3 जुलै रोजी त्यांनी त्यांचे दुकान दुपारी पाच वाजता कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातून सहा हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली.

4 जुलै रोजी सकाळी दात घासत खान दुकानासमोर आले असता त्यांना दुकानाच्या शटरला लावलेले कुलूप दिसले नाही. त्यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता सहा हजारांची रोकड चोरीला गेल्याचे उघड झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वर्धा शहर पोलीस ठाण्यात 6 जुलै रोजी आणखी एक घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात मनिष अशोकलाल नागदेव (वय 36, रा. दयाल नगर, वर्धा) यांनी फिर्याद दिली होती.

नागदेव यांचे दयाल नगर येथे अभिषेक मोबाईल रिपेअरिंग सेंटर नावाचे दुकान आहे. 5 जुलै रोजी दुपारी पाच वाजता नागदेव यांनी त्यांचे दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 20 हजारांची रोकड चोरून नेली. 6 जुलै रोजी सकाळी नागदेव दुकान उघडण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत त्यांनी गुन्हा नोंदवला होता.

वरील दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास एलसीबीचे पोलीस करीत होते. दरम्यान एलसीबीच्या पोलिसांना तपासादरम्यान माहिती मिळाली की, वरील गुन्ह्यातील आरोपी चोरीचा माल विकण्यासाठी वर्धा शहरातील इतवारा परिसरात फिरत आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हे केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी चोरट्यांकडून 20 हजार 620 रुपयांची सोन्याची एकदाणी व एक रिंग आणि 18 हजार 400 रुपयांची रोकड असा एकूण 39 हजार 20 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दोन्ही चोरट्यांना पुढील तपासासाठी वर्धा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वर्धा एलसीबीचे प्रमुख नीलेश ब्राह्मणे म्हणाले, “आरोपी अजय पवार हा सराईत चोरटा आहे. त्याच्यावर हिंगोली, वसमत, वडगाव मावळ, पुणे, अर्धपुर, वर्धा इत्यादी ठिकाणी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मागील दोन महिन्यांपासून तो वर्धा शांतीनगर येथील ओव्हर ब्रिजखाली झोपडी टाकून राहत होता.”

याबाबत वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उत्तर दिले नाही.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, सहाय्यक फौजदार प्रमोद जांभुळकर, पोलीस हवालदार निरंजन वरभे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.