Maharashtra Monsoon Update : मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाट्यात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

एमपीसी न्यूज : भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, कोकण आणि गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार, अतिमुसळधार आणि अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टीच्या आणि दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

गेले अनेक दिवस हुलकावणी देणारा पाऊस पुढील दोन दिवस जोरदार बरसणार आहे. मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात पुढील दोन दिवस गडगडाट आणि कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, अशी माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिली आहे.

पावसाने सुमारे दोन आठवडे दडी मारल्यानंतर शुक्रवारपासून राज्यातील विविध ठिकाणी कमी-जास्त सरींनी हजेरी लावण्यास सुरुवात केली. राज्यात गेल्या 1 जूनपासून सरासरी पाऊस झाला आहे. मराठवाडय़ात तर आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख डॉ. जयंत सरकार यांनी दिली आहे. उद्यापासून चांगला पाऊस होईल असे त्यांनी सांगितले.

मुंबईत चार दिवस ऑरेंज अॅलर्ट

मुंबईत पुढील चारही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईत ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. 70 ते 120 मि.मी.पर्यंत पाऊस होईल असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. महानगरपालिका प्रशासनही त्यादृष्टीने सतर्क झाले आहे.

कोकणात रेड अॅलर्ट

कोकणात पुढील पाच दिवस चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुढील दोन दिवस तर अति मुसळधार पाऊस कोकणात होईल असा इशारा हवामान खात्याने दिल्याने कोकणात रेड अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील काही भागांमध्ये 210 मि.मी.पर्यंत पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.