Chakan : वॉशिंग मशीन, एलईडी टीव्हीने भरलेला कंटेनर लुटणारी टोळी जेरबंद; 46 लाख 75 हजारांचा ऐवज हस्तगत

एमपीसी न्यूज – वॉशिंग मशीन, एलईडी टीव्हीने भरलेला कंटेनर लुटणा-या टोळीच्या चाकण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून चार गुन्ह्यातील 46 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.

माधव रोहिदास गीते (वय 22, रा. मेदनकरवाडी, चाकण. मूळ रा. नांदेड), मंगेश काकासाहेब शिंदे (वय 26), प्रदीप उर्फ ज्योतीराम जालिंदर देशमुख (वय 30, दोघे रा. खडकी जातेगाव, ता. करमाळा, सोलापूर), गणेश शांताराम राक्षे (वय 30, रा. राक्षेवाडी, चाकण), जयराम रामनाथ तनपुरे, कृष्णा उर्फ राहुल एकनाथ धनवटे, संदीप उर्फ आण्णा रावसाहेब धनवटे (वय 43, तिघे रा. राहुरी, अहमदनगर), राजेश महादेव बटुळे (वय 34, रा. निघोजे, ता. खेड), प्रवीण शंकर पवळे (वय 23, रा. राक्षेवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींचा एक साथीदार बबुशा उर्फ बाबाजी ज्ञानेश्वर नाणेकर (रा. नाणेकरवाडी) अद्याप फरार आहे.

रांजणगाव येथील हायर कंपनीमधून वॉशिंग मशीन आणि एलईडी टीव्हीने भरलेला एक कंटेनर भिवंडी मुंबई येथे जात होता. चाकण-शिक्रापूर रोडवरून जात असताना आरोपींनी कंटेनरला टेम्पो आडवा लावला. कंटेनर चालकाचे हातपाय बांधून, तोंडात बोळे कोंबून त्याला निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण केली. कंटेनरमधील 33 लाख 65 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना 27 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना चाकण पोलिसांना माहिती मिळाली की, दहा जणांनी मिळून हा गुन्हा केला आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यातील नऊ जणांना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपींकडून 33 लाख 65 हजार रुपयांचे वॉशिंग मशीन आणि एलईडी टीव्ही हस्तगत केले. आरोपी राजेश बटुळे याने त्याचे साथीदार विशाल भोसले, नितीन भोसले, अजय उर्फ पप्पू भोसले यांच्या मदतीने कुरुळी गावातून एमआरएफ कंपनीचे 4 लाख 80 हजार रुपयांचे टायर चोरले. या गुन्ह्यातील 4 लाख रुपयांचे 30 टायर जप्त करण्यात आले.

महिंद्रा कंपनीच्या पार्किंगमधून 1 लाख 80 हजार रुपये किमतीच्या एक्साईड कंपनीच्या बॅटरी चोरीला गेल्या. याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा देखील याच आरोपींनी केल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांच्याकडून 1 लाख 80 हजार रुपये किमतीच्या बॅटरी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पाईट येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेण्याचा याच आरोपींनी प्रयत्न केला. हा गुन्हा देखील या कारवाईमुळे उघडकीस आला आहे. एकूण चार गुन्हे उघडकीस आले असून चार गुन्ह्यातील 46 लाख 75 हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, उपनिरीक्षक विजय जगदाळे, पोलीस कर्मचारी सुरेश हिंगे, संजय जरे, वीरसेन गायकवाड, हनुमंत कांबळे, संदीप सोनवणे, निखिल वर्पे, प्रदीप राळे, नितीन गुंजाळ, अशोक दिवटे, मनोज साबळे, मछिंद्र भांबुरे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.