Pune News : हॉटेलमध्ये चार वर्षांच्या मुलाला साखरेऐवजी खाण्यासाठी दिला धुण्याचा सोडा

एमपीसी न्यूज : पुण्यात एका हॉटेलमध्ये चारवर्षाच्या मुलाला साखरेऐवजी धुण्याचा सोडा खाण्यासाठी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलाने साखर मागितली होती. पण वेटरने त्याला साखर समजून धुण्याचा सोडा खाण्यासाठी आणून दिला. या घटनेमध्ये मुलाची जीभ भाजली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात न्यावे लागले. चार वर्षाचा हा मुलगा आपल्या आजोबांसोबत हॉटेलमध्ये आला होता. आजोबांनी हॉटेल मालक आणि वेटर विरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

रविवारी संध्याकाळी आजोबा आपल्या दोन नातवंडांना फिरायला बाहेर घेऊन गेले होते. ते सारसबागेच्या उद्यानात गेले होते. तिथे खेळून झाल्यानंतर मुलांना भूक लागली. म्हणून संध्याकाळी साडेसहा वाजता मुलांना घेऊन, ते तिथेच जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये गेले.

“मी वॉशरुममध्ये असताना मुलाने वेटरकडे साखर मागितली. मी बाहेर आलो, तेव्हा नातू वेदनेने किंचाळत होता. मी त्याला लगेच पाणी दिले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याची जीभ लाल झाली होती. मी नातवाला विचारले, तू काय खाल्लस, तेव्हा त्याने सफेद पावडरच्या जारकडे हात दाखवला. मी ती पावडर हातावर घेऊन तपासली, तर ती साखर नव्हे तर तो धुण्याचा सोडा होता” असे आजोबांनी सांगितले.

रविवारी सगळे दवाखाने बंद असतात. त्यामुळे मुलाला जवळच्या रुग्णालयात नेले. त्याची जीभ भाजली होती. सोमवारी त्यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.