Washington: चित्रपट अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे कर्करोगाने अमेरिकेत निधन 

Washington: Film actor Saiprasad Gundewar passed away due to cancer in the United States

एमपीसी न्यूज – हिंदी चित्रपट तसेच हॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता साईप्रसाद गुंडेवार (42) याचे आज (सोमवारी) अमेरिकेमध्ये सकाळी साडे सातच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी सपना, आई राजश्री, वडील राजीव असा परिवार आहे. साईप्रसाद गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकेमध्ये कॅन्सरवर उपचार घेत होता.

साईप्रसाद दोन वर्षांपासून ‘ग्लायोब्लास्टोमा’शी (ब्रेन कॅन्सर) झुंज देत होता, अमेरिकेतील लॉस अँजेलिस येथे त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्याची प्राणज्योत मालवली.

साईप्रसादने एमटीव्हीवरील ‘स्प्लिट्सविला पर्व 4’ स्टार प्लस वाहिनीवरील ‘सर्वाइवर’, तसेच अमेरिकेतील लोकप्रिय SWAT, Cagney and Lacey, The Orville, The Mars Conspiracies, ‘द कार्ड’ या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘रॉक ऑन’, ‘पप्पू कान्ट डान्स साला’, ‘लव्ह ब्रेकअप जिंदगी’, ‘डेव्हिड’, ‘आय मी और मैं’, ‘पीके’, ‘बाजार’ इत्यादी हिंदी चित्रपटांसोबतच काही हॉलिवूडपट व लघुपटांमध्ये विविध भूमिका केल्या. डॉ. मीना नेरुरकर यांच्या ‘ए डॉट कॉम मॉम’ या एकमेव मराठी चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका केली आहे.

अभिनेते ऋषी कपूर, अभिनेता इरफान खान यांचे देखील कॅन्सरमुळे निधन झाले. बॉलिवूडच्या या दोन्ही कलाकारांनी देखील परदेशात जाऊन उपचार घेतले होते. अतिशय कमी वयात साईप्रसादचे निधन झाल्याने कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.