Washington: डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘व्हाईट हाऊस’मध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट 'निगेटीव्ह'

एमपीसी न्यूज – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वास्तव्य व कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये कोविड 19 विषाणूचा शिरकाव झाल्याने जगभर खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्या एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी ‘पॉझिटीव्ह’ आली आहे. राष्ट्राध्यक्ष किंवा उपराष्ट्राध्यक्ष या दोघांचाही संबंधित कर्मचार्‍यांशी जवळचा संपर्क नव्हतास असे व्हाईट हाऊसने आज (शुक्रवारी) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

‘उपराष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह झाल्याची माहिती संध्याकाळी मिळाली आहे,’ असे पेन्स यांचे प्रवक्ते केटी मिलर यांनी एका निवेदनात म्हटले आहे. ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किंवा उपराष्ट्राध्यक्ष पेन्स या दोघांचाही त्या कोरोनाबाधित व्यक्तीशी जवळचा संबंध नव्हता,’ असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

व्हाईट हाऊसमध्ये भोजनासाठी निमंत्रित केल्या गेलेल्या ब्राझीलच्या प्रतिनिधी मंडळातील एका सदस्याच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट ‘पॉझिटीव्ह’ आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: गेल्या आठवड्यात या कोरोना निदान चाचणी करवून घेतली. ट्रम्प यांच्या चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे, पण कोरोना विषाणू उद्रेकावर व्हाइट हाऊस टास्क फोर्सचे प्रमुख असलेले पेन्स यांची अद्याप चाचणी घेण्यात आलेली नाही.

कोरोना उद्रेकाचा केंद्रबिंदू चीन असून तो बाहेर देशांमध्ये पसरला, या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेकडून देशाला वाढत्या धमक्यांबद्दल वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतः अमेरिकेतील कोरोना उद्रेकाची परिस्थिती हाताळली आहे. त्यांना त्यांचे जवळचे सहकारी देखील त्यापासून रोखू शकले नाहीत. आता कोरोनाचा विषाणू व्हाईट हाऊसपर्यंत येऊन पोहचल्याने चिंता वाढली आहे.

कोरोना विषाणूने अमेरिकेची जगात सर्वाधिक हानी केली आहे. अमेरिकेत सुमारे 13 लाख लोकांना कोरोना संसर्ग झाला असून सुमारे 77 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनमुळे अमेरिकन अर्थव्यवस्था देखील अडचणीत आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.