Washington: डोनाल्ड ट्रम्प ‘डब्ल्यूएचओ’वर भडकण्याचे कारण काय?

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधितांची संख्या व मृतांचा आकडा काही केल्या कमी होत नसल्याने हतबल झालेले अमेरिकेने जागतिक आरोग्य  संघटनेबाबत (डब्ल्यूएचओ) कठोर भूमिका घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून देण्यात येणारा निधी रोखण्याचे आदेश अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. दरम्यान, अमेरिकेने हा निधी रोखला तर जागतिक आरोग्य संघटनेला मोठा झटका बसेल, असे खुद्द संघटनेने मान्य केले आहे, अमेरिकेने असा निर्णय घेण्याची ही वेळ नाही, असेही ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे.

कोरोना जागतिक महामारीमुळे संपूर्ण जग संकटात आहे. चीनमधून सुरु झालेल्या या धोकादायक विषाणूने सर्वाधिक विनाश महासत्ता असलेल्या अमेरिकेत घडवून आणल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेत आतापर्यंत 6 लाख 15 हजार 406 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत 26 हजार 164 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

_MPC_DIR_MPU_II

खरंतर कोरोना विषाणूचा प्रसार जगात वाढू लागल्यानंतर सुरुवातीपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओबाबत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. जागतिक आरोग्य संघटना चीनकेंद्रीत काम करत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. डब्ल्यूएचओने कोरोना महामारीच्या साथीबाबत जगाला सावध करण्यास विलंब केला, कोरोना विषाणूचे गांभीर्य लपवून ठेवले व या प्रकरणी वेळीच पावले उचलली नाहीत, असा त्यांचा आरोप आहे. अमेरिकेने चीनसह अनेक देशांवर प्रवासबंदीचा निर्णय घेतला होता. परंतु हा अतिशय चुकीचा आणि धोकादायक निर्णय असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते. ती टीकाही ट्रम्प यांना झोंबली होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या चुकीमुळे अनेक लोकांचा जीव गेला, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तसंच या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.

डब्ल्यूएचओचा निधी रोखण्याचा इशारा ट्रम्प यांनी यापूर्वी दिला होता. अखेर मंगळवारी (14 एप्रिल) त्यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली. अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला दरवर्षी 400 ते 500 दशलक्ष डॉलर्सची मदत केली जाते. हीच मदत रोखण्यात येत आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटना ही जगभरात आरोग्य क्षेत्राबाबत काम करते. यादरम्यान वर्षभर काही ना काही उपक्रम सुरुच असतात. यासाठी प्रत्येक देश जागतिक आरोग्य संघटनेत गुंतवणूक करतो. ज्यात अमेरिका हा अनेक वर्षांपासून सर्वाधित निधी देणारा देश आहे. अमेरिकेने मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेला 400 दशलक्ष डॉलर्स इतका निधी दिला होता,  तो जागतिक आरोग्य संघटनेच्या एकूण अंदाजपत्रकाच्या 15 टक्के आहे. या तुलनेत चीनबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा निधी अमेरिकेच्या निधीसमोर खूपच कमी आहे. चीनने 76 दशलक्ष डॉलर्स एवढा निधी दिला होता. याशिवाय 10 दशलक्ष डॉलर्सची अतिरिक्त मदत केली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.