Pune : जलसंधारण, पाणीबचतीवर भर देणे आवश्यक – डॉ. चंद्रकांत भोयर

मराठी विज्ञान परिषद, 'एमकेसीएल'तर्फे व्याख्यान

एमपीसी न्यूज – ”जलचक्रामधील एक अवस्था म्हणजे भूजल आहे, भूजलसाठे या नैसर्गिक संपत्तीला मर्यादा असून त्यावर हवामान बदलाचा परिणाम होतो. भूजलाच्या नियोजन आणि व्यवस्थापनाच्या बाबतीत खडकांच्या जलधारण क्षमतेचा अभ्यास करावा लागतो. शेती हा भूजलाच्या वापरामध्ये सर्वात मोठा भागधारक आहे, ६५ टक्के सिंचित क्षेत्र भूजलावर अवलंबून आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी तर शहरी भागात वापरासाठी जलसंधारण आणि पाणी बचतीच्या उपायोजना वर भर देणे आवश्यक आहे,” असे मत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. चंद्रकांत भोयर यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषद आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेती व भूजल क्षेत्रातील नवे शोध’ या विषयावर डॉ. चंद्रकांत भोयर यांचे व्याख्यान झाले. मयूर कॉलनीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन येथे झालेल्या या व्याख्यानाला मराठी विज्ञान परिषदेचे कार्यकारिणी सदस्य वसंत शिंदे, डॉ. सुजाता बरगाले, दीपाली अकोलकर, संजय माक आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

डॉ. चंद्रकांत भोयर म्हणाले,” शेती करताना पाऊस किती प्रमाणात झाला या नुसार पीक लागवडीचे व्यवस्थापन व नियोजन केले जावे. भूजलाच्या उपलब्धतेनुसार पीक पद्धतीमध्ये वेळोवेळी बदल करणे हे आजच्या स्थितीला सर्व गावांसाठी लागू आहे. भूजलाचा ताळेबंद ठेवून किती आणि कोणते पीक घ्यायाला हवे हे ठरवावे. जमिनीत खोलवर गेले की पाणी मिळत, असं नाही जर मिळाल तर ते टिकत नाही.

शेतीसाठी बोअरवेल खोदल्या जातात पण त्याला पाणी लागले तरी ते टिकेल याची शाश्वतता नसते. हिवरे बाजार येथे विविध यशस्वी प्रयोग झाले, तेथे सिंचनासाठी कोठेही बोअरवेल खोदल्या नाहीत. पाऊस किती प्रमाणात झाला याचा अभ्यास करून पिकांची लागवडीसाठी निवड करण्यात आली. शेती करताना बऱ्याचदा पाणी जास्त लागतील अशी पिके घेतली जातात मग त्या गावांना पाणी टंचाई जाणवते. गाव असो किंवा शहर यामध्ये एका बाजूला पाणी पुनर्भरणाच्या योजनेसह दुसऱ्या बाजूला पाणी बचतीच्या उपयोजनांवर जास्तीत जास्त भर असावा.”

डॉ. सुजाता बरगाले यांनी आभार मानले तर प्रस्तावना आणि निवेदन वसंत शिंदे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.