Water Cut Postponed: गणेशोत्सव होईपर्यंत पाणी कपात नाही : महापौरांची पुणेकरांना ‘गूड न्यूज’

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव होईपर्यंत पुण्यात पाणी कपात होणार नाही, असे स्पष्ट आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी दिले. 

महापौरांच्या अध्यक्षतेखाली धरणांत उपलब्ध असलेल्या पाणीसाठा संदर्भात आज बैठक झाली. त्यावेळी पुणेकरांवरील पाणीकपात तूर्तास टळली आहे.

कोरोनाच्या संकट काळात महापौरांनी पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. यावेळी आयुक्त विक्रम कुमार, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, अतिरिक्त आयुक्त यावेळी उपस्थित होते

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2 – 3 दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यानंतर 12 ते 15 ऑगस्ट नंतर महिन्याच्या शेवट पर्यंत मोठ्या प्रमाणात म्हणजेच जवळपास 104 टक्के पाऊस होणार आहे. त्यामुळे सध्या पाणीकपातीची गरज नाही.

पावसाळा अजूनही सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सव होइपर्यंत कोणतीही पाणीकपात होणार नाही. त्यानंतर  पाण्याचा उपलब्ध साठा याचा विचार करून निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

दरम्यान, सोमवार रात्री आणि आज सकाळ (मंगळवार) पासूनच शहर आणि धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सध्या 9.96 टीएमसी म्हणजेच 34.17 टक्के पाणीसाठा आहे.

या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 आहे. त्यामुळे आणखी काही दिवस दमदार पावसाची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.