Pimpri : शहरवासियांवर पाणी कपातीचे संकट; दोन दिवसांत होणार निर्णय

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरले असूनही पावसाळ्यात संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना त्यातच आत्ता प्रशासनाने पाणी कपात करण्याचे धोरण तयार केले आहे. याबाबतचा धोरणात्मक निर्णय आगामी दोन दिवसांत घेतला जाणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी कपातीला समोर जावे लागणार आहे. दरम्यान, शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरुन स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनावर हल्ला चढविला. 

पिंपरी -चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. पवना धरणातून महापालिका दररोज 480 ते 500 एमएलडी पाण्याचा उपसा करते. तरीही, शहरातील सर्वच भागात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. गणपती उत्सवात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. नवरात्रात देखील शहराच्या अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना पालिका प्रशासनाने आता पाणी कपातीचे धोरण तयार केले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याचे पडसाद आज (मंगळवारी)झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. विस्कळीत पाणीपुरवठ्यावरुन नगरसेवकांनी प्रशासनावर हल्ला चढविला. भाजपचे विकास डोळस म्हणाले, ‘दिघी, बोपखेलवासिय गेल्या अनेक दिवसांपासून तहानलेले आहेत. या परिसरातील पाणीपुरवठा अतिशय विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेl. धरणात मुबलक पाणी असतानाही पाणी मिळत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहे. आठ-आठ दिवस पाणी विस्कळीत राहते. विस्कळीत पाणीपुरवठ्यावर प्रशासनाने तोडगा काढणे गरजेचे आहे’.

राष्ट्रवादीचे राजू मिसाळ म्हणाले, ‘निगडी प्राधिकरणातील पाणीपुरवठा देखील विस्कळीत आहे. पुरेशा दाबाने पाणी येत नाही. पाणी कपातीला आमचा विरोध राहणार आहे. पाण्यामध्ये आम्ही कोणतेही राजकारण करणार नसून प्रशासनाने सर्व भागात समान पाणीपुरवठा करावा’.

भाजपचे विलास मडिगेरी म्हणाले, ‘गेल्या आठ दिवसांपासून इंद्रायणीनगर परिसरातील पाणीपुरवठा अतिशय विस्कळीत झाला आहे. नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. काही भागात अधिक दाबाने तर काही भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्यात यावा’.

त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘परतीचा पाऊस झाला नाही. त्यामुळे पाण्याची समस्या उद्‌भवत आहे. बंधा-यांची पातळी ‘मेंटन’ होत नाही. त्यामुळे शहराच्या काही भागात जादा तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. समान पाणीपुरवठा करण्यासाठी आठ दिवसातून शहरातील एका भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात यावा किंवा एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास समान पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. गटनेत्यांची बैठक घेऊन त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल’.

दरम्यान, महापौर राहुल जाधव पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे जलसंपदा विभागाचा पत्र आले आहे. सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पाणी कपात करणे गरजेचे आहे. त्याबाबतचा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रस्ताव तयार केला आहे. नगरसेवकांची बैठक घेऊन दोन दिवसात त्याची अमंलबजावणी केली जाईल’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.