Pune : बेबी कालव्याच्या दुरावस्थेमुळेच पुण्यात पाणी टंचाई

एमपीसी न्यूज – मुंढवा जॅकवेल प्रकल्पात सांडपाणी शुद्ध करून शेतीच्या पुनर्वापरासाठी बेबी कालव्यात सोडण्याची योजना दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. मात्र, या कालव्याची दुरवस्था झाल्याची धक्कादायक बाब स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या पाहणीतून समोर आली आहे. अनेक ठिकाणी हा कालवा बुजला आहे, तर ठिकाणी चक्क कालव्यातच पाइप टाकून भराव घालून कच्चा रस्ता बांधला गेला आहे. त्यामुळे पाणी वापरावरून पुणेकरांवर ताशेरे ओढणारे जलसंपदा मंत्री, पालकमंत्री जलसंपदा विभागाच्या निष्क्रियतेकडे डोळेझाक करत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

पुणे जिल्ह्यात पाणी टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने कालवा समितीच्या बैठकीत शहराच्या पाण्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी एक वेळ पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून, सोमवारपासून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर ही पाणीबाणी लादली गेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर या कालव्याची दुरुस्ती करून मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने पाणी घेऊन ते शेतीसाठी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाला द्यावे आणि धरणातील पिण्याचे पाणी शहराला मिळावे, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.