Pune: पाऊस लांबल्याने पुणेकरांवर पाणीकपातीची ‘टांगती तलवार’

Water shortage crisis as no rains in Pune region.

एमपीसी न्यूज – जून महीन्यात सुरुवातीला काही दिवस हजेरी लावणाऱ्या पावसाने जुलै महिना संपत आला तरी ओढ दिली आहे. दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमालीचा खालावत चालला आहे. त्यामुळे असाच आणखी पाऊस लांबल्यास पुणेकरांच्या पाण्यात कपात होऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.

सध्या पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत केवळ 9.73 टीएमसी म्हणजेच 33.36 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत तब्बल 14.81 टीएमसी पाणीसाठा होता.

या चारही धरणांची एकूण क्षमता 29. 15 टीएमसी आहे. ही धरणे भरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात 0.64 टीएमसी, पानशेत 4.47, टेमघर 0.69, वरसगाव 3.93 टीएमसी असा चारही धरणांत एकूण 9.73 टीएमसी पाणीसाठा आहे.

यावर्षी निसर्ग चक्रीवादळाच्या काळात धरण परिसरात पाऊस पडला आहे. त्यानंतर पाऊस लांबला. त्यामुळे धरणांत उपलब्ध असलेल्या पाण्याचे नव्याने नियोजन करण्यात येणार आहे.

दरवर्षीच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात चांगला पाऊस होतो. यावर्षी मात्र गेला पाऊस कुणीकडे असे म्हणण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे.

साधारणत: १५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडतो.

जलसंपदा विभागाकडून यंदा दोन वेळा शेतीसाठी आवर्तन घेण्यात आले. ३१ मार्चपासून ४० दिवसांचे पहिले उन्हाळी आवर्तन घेण्यात आले.

या कालावधीत मुठा उजव्या कालव्यातून पाच टीएमसी पाणी सोडण्यात आले.  आगामी १५ दिवसांत पडणारे पावसाचे प्रमाण पाहून भविष्यातील नियोजन केले जाणार आहे.

पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास १० ते १५ ऑगस्ट या कालावधीत धरणांतील उपलब्ध पाण्याचा आढावा घेऊन नव्याने नियोजन करण्यात येणार आहे.

पुणेकरांच्या पाण्याबाबत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ते काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

रोज आकाशात काळेकुट्ट ढग दाटून येतात. पाऊस येण्याची चिन्हे असताना मधेच ऊन पडते. असे विची वातावरण सध्या पुणे शहरात निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.