Dighi : ‘पाणीपुरवठा विभागाने आजारातून बरे व्हावे, गुलाबपुष्प देऊन अनोखे आंदोलन’

नगरसेवक विकास डोळस यांचे अनोखे आंदोलन

एमपीसी न्यूज – दिघीसह उपनगरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ नगरसेवक विकास डोळस यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना गुलाबपुष्प भेट देऊन आजारातून बरे होण्याचे आवाहन केले. अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. तसेच येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास हजारोंचा मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्यापासून दिघीसह उपनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याच्या निषेधार्ध नगरसेवक डोळस यांनी आज (शनिवारी) पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांना गुलाबपुष्प भेट देऊन आजारातून बरे होण्याचे आवाहन केले. गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. पाणीपुरवठा विभागाचा निषेध केला. यावेळी नगरसेवक लक्ष्मण उंडे, कुलदिप परांडे,  राजेंद्र तापकीर, सागर डोळस, सिकंदर मुजावर, दिपक परांडे, प्रमोद परांडे, अनिकेत कुलाडे, संतोष निकाळजे, विनोज डोळस आदी उपस्थित होते.

नगरसेवक विकास डोळस म्हणाले, ”एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्यापासून पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. दिघी आणि उपनगरांमध्ये मोठी पाणी समस्या आहे. परिस्थिती भयंकार आहे. दोनवेळा नागरिक रस्त्यावर येत आहेत. एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्यापासून पंप नादुरुस्त असल्याची कारणे दिली जातात.

सातत्याने तक्रार करत  आहे. पण, समस्या सुटत नाही. नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे गुलाबाचे फूल देऊन अधिका-यांचा आज निषेध केला. आता गेट वेल सून म्हणत आहोत. परंतु, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही डोळस यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.