Pimpri: पाणीपुरवठा, रस्ता बंद, वाहतुकीतील बदलाची माहिती ‘पीसीएमसी 1’ अॅपवर! 

एमपीसी न्यूज – पाणीपुरवठा बंद आहे…..शहरात अमुक भागात खोदाईची कामे सुरु आहेत….उत्सावादरम्यान कुठले रस्ते बंद असणार आहेत…… वाहतूक कोठून वळविली आहे…. याची  इत्थंभूत माहिती शहरवासियांना आता ‘पिंपरी-चिंचवड महापालिका-वन’ या अॅपद्वारे मिळणार आहे. आदल्या दिवशीच माहिती मिळाल्याने नागरिकांचा मनस्ताप आता कमी होणार आहे. या अॅपचा पालिकेने आज (बुधवार)पासून वापर सुरु केला असून उद्यापासून पोलीस देखील वापर करण्यास सुरुवात करणार आहेत. प्लेस्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. महापालिका हे अॅप चालविणार असून त्याचा खर्च राज्य सरकारने केला आहे. 

राष्ट्रीय पातळीवर सुरु केलेल्या नाविन्यपुर्ण व स्टार्टअप उपक्रम अंतर्गत राज्य सरकारने नविन उद्योजकांना व्यवसायाच्या संधी प्राप्त करुन दिल्या आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेमार्फत देखील या बाबतचे सहाय्यभुत धोरण राबविले जात आहे. त्या अंतर्गत पालिकेने ‘पिंपरी-चिंचवड – वन’ या नावाने मोबाईल अॅप कार्यन्वित केले आहे. या मोबाईल अॅप द्वारे नागरिकांना आवश्यक माहितीचे प्रसारण, संदेश, परिपत्रक, निवेदन इत्यादी स्वरुपाची सर्व माहिती एकाच अॅप द्वारे नागरिकांना सहजरित्या उपलब्ध होणार आहे. या अॅपचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते आज (बुधवारी) अनावरण करण्यात आले. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेविका भीमाबाई फुगे, निर्मला गायकवाड, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण उपस्थित होते.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, नागरिकांना माहिती देणे व ती उपलब्ध करणे हे सुशासनासाठी उपयुक्त आहे. ‘पिंपरी-चिंचवड वन अॅप’ हे महापालिकेसाठी महत्वाचा पुढाकार असून योग्य रणनिती आहे. याद्वारे महापालिका थेट नागरिकांच्या संपर्कात राहील. आपत्ताकालीन वेळेस पालिकेला कोणते आवाहन करायचे असल्याच या अॅपद्वारे केले जाईल. आजारांबाबत जनजागृती केली जाईल. शहरामध्ये होणा-या घडामोडीची माहिती तातडीने नागरिकांना या अॅपद्वारे मिळणार आहे.

‘पिंपरी-चिंचवड-वन’ मोबाईल अॅप द्वारे नागरिकांना एकाच ठिकाणी शहरांची संपुर्ण माहिती, चित्रफित, संदेश, तसेच कोणतीही तातडीची माहिती अॅप द्वारे शोधता येईल. या अॅप मध्ये माहितीचे विविध विषयवार स्वतंत्र भाग केले असून त्याबाबतचे नवे अपडेट त्या भागामध्ये विषयवार समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्याचा महापालिकेने वापर सुरु केला असून पोलीस देखील त्याचा उद्यापासून वापर सुरु करणार आहेत. तसेच महापालिका, सारथी अॅपला हे लिंक करण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे. उत्सावादरम्यान कुठला रस्ता बंद ठेवण्यात आला आहे, याची सर्व माहिती नागरिकांना या अॅपवरुन मिळणार आहे.

हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.workapps.knowledge.pimpriChinchwadOne

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.