WB Election : ‘मी माझ्या सर्व सभा रद्द करतोय, इतर राजकीय नेत्यांनीही विचार करावा’ – राहुल गांधी

एमपीसी न्यूज – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. मात्र, वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. राहुल गांधी यांनी सर्व राजकीय नेत्यांना प्रचारसभा घेण्यासंबंधी विचार करण्याचं आवाहन केलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये शनिवारी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. पाचव्या टप्प्यात एकूण 79.18 टक्के मतदानाची नोंद झाली. यानंतर राहुल गांधी यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महत्वाचा निर्णय घेतला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, ‘कोरोनाची स्थिती लक्षात घेता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व प्रचारसभा रद्द करत आहे. मी सर्व राजकीय नेत्यांना सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी सध्याच्या परिस्थितीत मोठ्या गर्दीत सभा घेण्याच्या परिणामांचा गांभीर्याने विचार करावा’.

राहुल गांधी यांनी सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर काँग्रेस नेत्यांकडून स्वागत करण्यात येत असून सर्वांसमोर एक उदाहरण ठेवत असल्याचं म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा कहर सुरू असला तरी विधानसभा निवडणुकांचा प्रचारही धूमधडाक्यात सुरू आहे. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये गेल्या 24 तासांत सहा हजारांहून अधिक रुग्णवाढ झाली. तिथे आणखी तीन टप्प्यांचे मतदान बाकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.